पाहिलेले देश भेटलेली माणसं
पाहिलेले देश भेटलेली माणसं
लेखिका मंगला नारळीकर
प्रकाशक राजहंस प्रकाशन
संपादक सुजाता देशमुख
प्रथम आवृत्ती मार्च 2010
तृतीय आवृत्ती जुलै 2012
आय एस बी एन 978- 1 -7434 -4939
मूल्य 250/-
पृष्ठ संख्या 255
संक्षिप्त परिचय
हे नेहमीचे प्रवासवर्णन नाही.निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यातून इतिहासाचा वेध घेत केलेला प्रपंच.अनुभव श्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढ्याच उद्देशाने साधलेला सहसंवाद. मंगलाजी नारळीकर या फक्त डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी नव्हत्या तर एक सिद्ध हस्त लेखिका देखील होत्या.माझ्या बालपणात त्यांचे विविध लेख मी साप्ताहिक सकाळ आणि सकाळच्या रविवार पुरवणीमध्ये वाचायचे. त्यांच्यामुळेच मला विविध देशांमध्ये डोळस पर्यटन करण्याची आवड निर्माण झाली.हे पुस्तक वाचताना मला हे जाणवले की मंगलाजी आणि माझ्या प्रवासी विचारसरणीमध्ये किती साम्य आहे.पुस्तक त्यांनी डॉ जयंत नारळीकर यांना अर्पण केले आहे ज्यांच्या कामामुळे आणि सहवासामुळे त्यांना देशोदेशीचा प्रवास घडला. त्यांचं एक वाक्य ऑस्ट्रेलिया बद्दल खूप बोलके आहे." मूळचे वसाहत करणारे ब्रिटिश होते.तरी अगदी सावकाश का होईना पण या राष्ट्राचा चेहरा आशियाई होतो आहे."
सविस्तर परिचय
या पुस्तकामध्ये त्यांच्या विविध लेखांचा संकलित समावेश आहे. 1997 पासुन सुरु झालेला त्यांचा प्रवास विविध देशांमध्ये आणि कालखंडातील आहे.यातील काही देश आपण आत्ता नाही जाऊ शकत जसे की पाकिस्तान.काही देशांना त्यांनी एकापेक्षा अधिक वेळा भेट दिली. त्यामुळे त्या देशांची संस्कृती,राजकीय परिस्थिती,हवामान आणि अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. उदा.जपान ऑगस्ट 1997 आणि 2001 साकुरा (मार्च/एप्रिल),श्रीलंका,फ्रांस.
पुस्तक जुन्या पद्धतीचे असल्यामुळे फोटो कृष्णधवल आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरती त्यांनी काही निवडक त्यांचे आणि नारळीकरांचे फोटो दिलेले आहेत. त्यांची 2 ll ,1 ll लिहिण्याची पद्धत मला पुस्तक वाचताना आवडली. एका पिढीचे प्रतिनिधित्व आहे ते.
आपल्याला प्रत्येक प्रवासात मंगलाजींचे वनस्पतीशास्त्र प्रेम दिसते. त्यांनी केलेले झाडांचे वर्णन,प्रजाती यांची माहिती संकलन खूप सखोल आहे. त्या मुळात गणित विषयाच्या पदवीधर. त्यामुळे हे निरीक्षण विशेष आहे.
प्रत्येक प्रवास त्या डोळसपणे करतात.कंबोडिया मधील अंकोरवाटचे जुने मंदिर,श्रीलंका आणि तेथील वाटिका,अरमेनिया आणि त्याची प्राचीन संस्कृती,चिल्ले आणि मेक्सिको यांचे इतिहास आणि वसाहतवादी संस्कृती यांचा संगम. चीन आणि प्रगती,जपान आणि शिस्त,आफ्रिका आणि विषमता याच्यावर खूप प्रामाणिक टिप्पणी करतात.या पुस्तकांमध्ये आपल्याला काही खूप वेगळ्या नावाची गावे समजतात. जसे मेक्सिको मध्ये झकाटकास,टोबालाबा.
फ्रांस
फ्रांस या देशाला त्या विविध कालखंडामध्ये भेट देतात. तेथील संग्रहालये,त्यांच्या संवर्धन पद्धती ह्यांची माहिती, खाद्य संस्कृती,फॅशन बद्दल प्रेम,तेथील वास्तुकला आणि शिल्पकला याचे अनेक अनुभव त्या सांगतात.
कंबोडिया
कंबोडियामध्ये लेखिकेचा एका लोकल मुलासोबत झालेला संवाद खूप काही सांगून जातो.दोन मुली त्या सायकल रिक्षा चालवणाऱ्या मुलाला म्हणाल्या की व्हिएतनांपेक्षा कंबोडिया महाग आहे.कमी पैशात प्रवास अनुभव घेणार्यापैकी त्या होत्या.या देशात अन्नपदार्थ, हॉटेल्स त्यांना जरा महाग वाटले. त्यांचं बोलणं ऐकून रिक्षावाला खवळला आणि म्हणाला," इथे महाग वाटतं का, मग जपान, स्विझरलँड मध्ये किमती कशा आहेत?" त्याचा देश अभिमान आणि जपान, स्विझरलँड मध्ये सर्वाधिक महागाई आहे हे माहिती असल्याचं लेखिकेला नवल वाटलं. या विद्यार्थिनी गरीब असतील आणि इतर आशियायी देशांच्या तुलनेने येथे महागाई दिसली असेल असं त्यांनी त्याची समजूत काढली.
कंबोडिया मध्ये साम्यवादी राज्याचा प्रभाव म्हणून उच्च शिक्षण सर्वांना नसेल तरी प्राथमिक शिक्षण सर्वांना आहे.एक राष्ट्रीय अस्मिता आहे असे लेखिकेला वाटलं. त्यांना मंदिर दाखवणारा गाईड म्हणतो," एवढी मंदिर बांधण्यापेक्षा त्या राजाने जास्त तलाव ,शाळा बांधून प्रजेचं यहलोकीचे जीवन सुखकर केलं असतं तर बरं झालं असतं."
मी नुकतीच या देशाला भेट दिली आहे. त्यामुळे मला देखील हे पटलं.तिथल्या गरिबीपेक्षा त्यांच्या मनावर असलेल्या एका अस्थिरतेचे भाव हे खूप मनाला त्रास देतात.
मध्यरात्रीच्या सूर्य
योग्य वेळ आणि संधी ह्याचा अनुभव येते. साधारणतः 22 वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या प्रवास वाचण्याजोगा आहे.
आफ्रिका खंड आणि सुर्य ग्रहण
झिंबाब्वे आणि त्याच्या बाजूच्या देशांचा सूर्यग्रहणाच्या निमित्ताने झालेला प्रवास,तेथे जाणवलेल्या दोन देशांमधील फरक( दक्षिण आफ्रिका बाजूची श्रीमंती आणि झिंबाब्वे मधील गरिबी),तेथील मर्यादित खाद्य संस्कृती,जंगली मुक्त प्राणी, त्यांच्या सोबत चे अनुभव छान लिहिले आहेत. ह्या वाचनात जाणवते की आपण जंगलात प्राण्यांच्या आवारात आपला निवारा उभारला आहे आणि ते तेथील मुळ निवासी आहेत.
पुण्याचे brother from another mother शहर वॅलेन्सिया
स्पेनच्या प्रवासामध्ये लेखिकेला पुणे शहराचं जुळं शहर अनुभवण्याची संधी मिळाली. वॅलेन्सिया....दुपारी एक ते चार झोपणारे. सीएस्ता = वामकुक्षी
वॅलेन्सिया स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावर आणि भूमध्य समुद्राच्या काठी असलेले एक जुने युरोपियन सांस्कृतिक शहर.आधुनिक रस्ते,तूरिया नदी या गावातून वाहते. खास स्पॅनिश संस्कृतीचा आनंद देणारे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सीएस्ता किंवा दुपारची वामकुक्षी.युरोपच्या दुसऱ्या देशात हा प्रकार दिसत नाही. आरामात चवीने जेवावं आणि वामकुक्षी करावी ही स्पॅनिश पद्धत. दुपारी सगळेच ऑफिसेस एक ते चार बंद. रात्रीचे जेवण नऊ वाजेनंतर सुरू होणार. नऊच्या आधी रात्रीचे जेवण मिळणार नाही. तरी सुद्धा उत्तम हवामान आणि संस्कृती अनेक युरोपीय लोक तेथे सुट्टी घालण्यास येतात.
चीन
चीनच्या प्रवासामध्ये आपल्याला चिनी रेल्वे प्रवासाचा शिस्तबद्ध अनुभव येतो.जपानी रेल्वे जगामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु त्याच्या खालोखाल चीनी रेल्वे सुविधांचे नाव यायला हवे. त्याचा अनुभव मी नुकताच माझ्या लाव आणि Uzbekistan या प्रवासात घेतला. जिथे चीनने आपले रेल्वेचे जाळे पसरवले आहे. तीच शिस्त आणि नियम इतक्या वर्षांनी तंतोतंत. तिथे झालेली खाद्य संस्कृती गम्मत वाचल्यासारखी आहे. मोठा बाऊल भरून सूप आणि नूडल्स खाणे ही एक कसरतच असते.टेराकोटा आर्मी आणि इतर चिनी राजवाडे,संस्कृती याचे सुयोग्य वर्णन आहे. त्याच दरम्यान ऑलिंपिक असल्याने भव्य सोहळा पाहण्याचा योग पण लेखिकेला येतो.ब्रिज क्रॉसिंग नूडल्स सूप ह्याची कहाणी मजेशीर आहे. चीन मध्ये मुस्लिम लोक चिनी रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी असतात. कारण मुस्लिम लोक फक्त हलाल पद्धतीने कापलेला मास खातात. पोर्क म्हणजे डुकराच्या मासाला शिवत नाही. त्यामुळे मुस्लिम लोक चीनी रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी असतात.परिषदेसाठी आलेली एक मलेशियन मुस्लिम महिला भारतीय कर्मठ दक्षिणात्य आणि उत्तर हिंदुस्तानी ब्राह्मण यांच्या सोबत एका पंक्तीत बसली.त्यामुळे आपल्या समाजाच्या रेषा बाहेर पडल्यावर किती फिकट आहेत हे जाणवते.
अरमेनिया
अरमेनिया पुर्व युरोप मध्ये एक छोटेसे राष्ट्र. आजुबाजुला मुस्लीम राष्ट्र असुन पण आपली वेगळी ओळख आणि संस्कृती जपणार. अपोस्टॉलिक कॅथलिक पंथाचा धर्म आणि संस्कृती अजुन ही जिवंत ठेवणारे राष्ट्र. व्हॅटिकन पोपच्या अधिपत्याखाली ते नाहीत. धर्मगुरू कॅथोलिकोस त्याच देशात राहतो. त्यांची भाषा आणि लिपी वेगळी. इसवी सन 301 मध्ये राजधर्म आणि राष्ट्रधर्म म्हणून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारा हा जगातला पहिला देश. येरेवान राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर. आजही डायरेक्ट विमानसेवा नाही. स्वतःची खाद्य संस्कृती जपणारे लोक पण भारतीय संस्कृती सोबत अनेक साम्य ठेवणारा हा देश. मुख्यत्वे खाद्य संस्कृती. जसे बेसिल वनस्पती आहाराचा मुख्य भाग आहे. जे तुळशीचाच प्रकार आहे. तसेच लावारिस नावाचा खरपूस भाजलेली चपटी पोळी. एक विशिष्ट चीज. त्याचं नाव पानीर. मीठ घातलेल्या पनीर सारखं लागतं. एक सूप म्हणजे आपले पांढरी कडीच . त्यात शिजलेले गहू घालतात.
आपल्या संस्कृतीत तुळशी जेवढे पवित्र मानले जाते तसेच या देशांमध्ये बेसिल पवित्र मानले जाते. मृत्यू नंतर पण बेसिल चा वापर येथे करतात. गार्णी टेम्पल ख्रिस्त पूर्व काळातील जुने सूर्य मंदिर. रशियन काळात पुन्हा बांधले गेले. त्यातल्या मूळ देवतेचे नाव मित्र. संस्कृत मधील सूर्याचे एक नाव. गाभारा सध्या रिकामा आहे.एका मोठ्या जुन्या ख्रिश्चन मिशनच्या मठा जवळून वाहणाऱ्या नदीचे नाव आझाद. अर्थ देखील तोच स्वातंत्र.
येरेवान शहरात खास संग्रहालय आहे जिथे हस्तलिखिते संग्रह आहे. हस्तलिखितांचा अकरावा शतकांपासून नीट सांभाळ हे संग्रहालय करते. मूळ बायबल यांनी भाषांतरित करून ठेवले आहे. आधुनिक पुस्तकांच्या विभागात एक 1795 मध्ये अरमेनियान भाषेतील पुस्तक मद्रास मध्ये छापला गेले ह्याचा उल्लेख पहिला पानावर आहे.
त्या काळात अरमेनियन लोक व्यापारासाठी मद्रास येथे जाऊन राहिल्याची नोंद आहे. या संग्रहालयात बायबलची एक प्रचंड मोठी प्रत आहे. ती गायीच्या चामडी पासुन बनवलेली आहे.ती पहिले टर्की मध्ये होते. अरमेनियन लोकांची तेथून हकालपट्टी झाल्यावर दोन बायकांनी पान सोडवली आणि गाढवावरती चढवून ते घेऊन आल्या. एक पोहोचली. दुसरीचा वाटेत मृत्यू झाला. पान सुरक्षित रहावे म्हणून एका चर्चमध्ये पुरवून ठेवले होते. पुढे रशियन सैनिकाला ती सापडली आणि त्याने येरेवान येथे आणली. परत त्याची बांधणी करून ह्या देशाने तिचे संवर्धन केले.परदेशी हस्तलिखितांमध्ये एक तामिळ भाषेतील ताडपत्री पट्ट्यांचे पुस्तक देखील आहे.राशी पत्रकांचे.1991 मध्ये रशियापासून हा देश स्वतंत्र झाला.
देश चिमुकला आहे परंतु परदेशी स्थायिक झालेले अरमेनियन लोकांच्या मदतीने प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आहे.प्रवासासाठी आजही तो फारसा खुला नाही.आपले मर्यादित पर्यटन आणि सोवियत लोकांनी दिलेले अणुभट्ट्या, वीज निर्मिती याच्यावरती आधुनिक बनतो आहे. आपली भाषा, धर्म आणि संस्कृती जपून ठेवणारा आधुनिक जगात जागा मिळवून पाहणारा चिमुकला देश अरमेनिया.
कालानुरूप बदल
पुस्तकातील काही संदर्भ आजच्या काळामध्ये खुप नॉर्मल वाटतात. जसं विमान दूर उभे असेल तर प्रवासांना एका बस सारख्या वाहनामध्ये घालून विमानापर्यंत नेले जाते. त्याकाळी हे नवीन होते. आता नियमित आहे. अधिक काळासाठी लेखिका आणि त्यांचे पती राहणार असतील तर तेथे त्यांनी भाड्याने अपार्टमेंट विकत घेतले होते किंवा कुठल्या गेस्ट हाऊस मध्ये राहिले होते. म्हणजे आजच्या जमानातलं एअर बीएनबी म्हणायला हरकत नाही.
चिले मध्ये घड्याळाचा तास बदलणे ही संकल्पना लेखिका समजते. भारतामध्ये आपण बारा महिने एकच प्रमाण वेळ मानतो.परंतु दक्षिण आणि उत्तर गोलार्धामध्ये वर्षातून दोन वेळा घड्याळाची वेळ बदलायची सूचना मिळते. घड्याळ तास मागे किंवा एक तास पुढे केले जाते. दिवस मोठा होतो, सूर्य लवकर उगवतो, त्यामुळे एक तास घडे पुढे करायला लागते. जेव्हा दिवस लहान होतो तेव्हा घड्याळ एक तास मागे केले जाते. युरोप मध्ये देखील अशी पद्धत आहे.
समारोप
आजच्या काळामध्ये ट्रॅव्हल लॉग हे एक व्यवसाय बनला आहे. तरी लेखिकेचा निर्मळ प्रवास मनात घर करतो. ही माझी गुरुदक्षिणा त्यांना कारण त्यांच्या मुळे मी आज एक अस्सल प्रवास प्रेमी आहे. परिचय कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.
Comments
Post a Comment