《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत
《 श्री गणेश 》
आशियाचे आराध्य दैवत
लेखक:डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर
राजहंस प्रकाशन
प्रकाशक:दिलीप माजगावकर पुणे
पहिली आवृत्ती ऑगस्ट 2009
दुसरी आवृत्ती एप्रिल 2013
छापील किंमत 175 रुपये
आयएसबीएन 9781 7434 4687
सगळ्या विद्या आणि कलांचा अधिपती, शिवपार्वतीचा पुत्र आणि कार्तिकेय चा भाऊ ,विघ्नहर्ता, आपला गणपती बाप्पा साऱ्यांचाच लाडका आहे. आपल्या महाराष्ट्रात तो अतिशय जवळचा सखा आहे. गणेशोत्सव आपण साजरा करतो.गणेश स्तोत्र रोज म्हणतो. हाच गणेश आशियाचा देखील आराध्य दैवत आहे.
हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे पुस्तक आहे. गणपती किंवा गणेश याचा उगम कसा झाला ह्या विषयाचा नाणेशास्त्र
,मुर्तीशास्त्र ,इतिहास,पुराण,शिल्पकला किंवा शिल्प (सध्या उत्खननामध्ये उपलब्ध) जे जपून ठेवले आहेत यांचे संदर्भ देत आपल्याला गणपती या देवतेचे विविध कालखंडातील स्वरूप, त्याच्या जन्माच्या आख्यायिका, काही परकीय इतिहासकारांनी लिहिलेले वादग्रस्त टिप्पण्या व इतर गोष्टी याबद्दल आपल्याला या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते.
पाकिस्तान,अफगाणिस्तान,नेपाळ, तिबेट, जपान,
बांगलादेश,श्रीलंका,थायलंड, इंडोनेशिया,मध्य आशिया,
चीन,व्हिएतनाम,कंबोडिया इत्यादी प्रदेशात गणेशाची उपासना पद्धती रूढ होती.आजही कित्येक ठिकाणी चालू आहे. अनेक रुप,धर्म,प्रतीके,राजवटी,परंपरा,पद्धती,कथा,स्तोत्रे अशा विविधतेने नटलेल्या,लोकमानसात प्रसिद्ध मोरयाची आगळीवेगळी कहाणी डॉक्टर मधुकर ढवळेकर आपल्याला या पुस्तकाच्या स्वरूपातून सांगतात.
गणेश व त्याची विविध वाहने याबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. गणेश आणि मूषक / उंदीर हे आपल्याला ठरलेले समीकरण म्हणून माहित आहे. परंतु या पुस्तकामध्ये मोर, मगर ,कासव ,सिंह यासारखे प्राणी देखील वाहन म्हणुन वापरायचे ही दुर्लभ माहिती मिळते.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक अतिशय सुंदर संदर्भसूची दिली आहे. संदर्भाला नंबर दिलेला आहे.त्यामुळे अधिक खोल ह्या विषयाबद्दल जाणून घेऊ शकतो.त्यातील असलेले तर्क अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायला आपल्याला मदत होते.अनेक रंगीत आणि कृष्णधवल चित्रे, संग्रहालयातील फोटो यामुळे आपल्याला गणेशाचे जे मुर्ती रूपातील स्वरूप आहे ते चांगल्या पद्धतीने समजते.
थोडेसे ऑफ बीट पण इतिहासाची आणि गणेशाची माहिती जाणून घ्यायला उत्सुक असणारा वाचकांसाठी हे पुस्तक खरंच ज्ञानात भर घालणारे आहे.
परिचय
यामध्ये तीन प्रकरणे आहेत.
1.उगम: गज ते गण
2.विकास : गण ते गणेश
3 गणेश ते महागणेश
"दोन हातांचा नग्न गजमुखी गण ते 16 हातांचा देव हा प्रवास मनोरंजक आहे".
प्रकरण पाहिले उगम -गज ते गण
भारतीय उपखंडाच्या वायव्य सीमेलगत गांधार प्रांतात (कपिषा आजचे बेग्राम) असलेल्या पवित्र हत्तीचा विकास पुढे गणेश/ गजानन या अत्यंत लोकप्रिय दैवतात कसा झाला,भारतभर त्याचा प्रसार, कालांतराने आशियाच्या इतर देशातही जिथे जिथे भारतीय मंडळी गेली तिथेही झाला. मुळातला हा गजक/ हत्ती एक प्राणी होता ज्याला तेथील आदिम जमातींच्या लोकांनी शक्ति चे प्रतीक मानुन त्याची उपासना सुरू केली. पुढे ग्रीक राजवटी व लोकांनी पण त्याचा स्वीकार करून त्याला आपल्या चलनात स्थान दिले. त्याला कालांतराने हिंदुदैवत पंथात उच्च स्थान मिळाले.त्याचा स्वतंत्र पंथ पण निर्माण झाला आणि इतर धर्मातही त्याला स्थान मिळाले. त्याच्या मुर्त्या घडवल्या गेल्या व त्याच्या लोकप्रियतेमुळे भारतीयांनी परदेशात त्याला आपल्याबरोबर नेले.
इसवी सनाच्या सुरुवातीपासून भारतीय मंडळी व्यापाराच्या निमित्ताने आशियाच्या निरनिराळ्या देशात गेली. पुढे पाचव्या सहाव्या शतकापासून भारतीय मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवास करू लागले.प्रवास निर्विघ्न पार पडावा, तेथे व्यापारात यश मिळावे म्हणून गणेशाच्या मुर्त्या आपल्या बरोबर नेल्या.त्यामुळे गजाननाची पुजा विविध आशियाई देशांमध्ये सुरू झाली.
गण,गणेश,महा गणेश,विघ्नहर्ता,विनायक असा प्रवास सुरु राहिला. त्याची लोकप्रियता अमाप वाढली. हा इतिहास अत्यंत मनोरंजक आहे.
प्रकरण दुसरे-विकास : गण ते गणेश
बौद्ध,जैन,हिंदू या तिन्ही धर्मांमध्ये गणेशाला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. नाणेशास्त्र, इतिहासातील विविध कालखंड,राजाच्या काळात पाडली गेलेली नाणी,त्या काळातली उपलब्ध असलेली उत्खननात सापडलेली शिल्पे याचा आधार घेत डॉक्टर आपल्याला गण ते गणेश कसा झाला हे विस्तृत समजावून समजावतात. विघ्नहर्ता किंवा विघ्न करविता हा प्रवास समजतो. तांत्रिक पंथाच्या उपासकांना गणपती कसा महत्त्वाचा होता. तसेच जैन आणि बौद्ध धर्मामध्ये देखील शिल्पांच्या स्वरूपात आपल्याला गणपतीचे स्थान किती अढळ होते हे समजते. गणपती या देवाच्या जन्म बद्दल असलेल्या अनेक आख्यायिका,वेद, पुराणे याबद्दल बरीच तर्कशुद्ध माहिती ते सांगतात.या प्रकरणांमध्ये विविध व्याख्या आपल्याला कळतात.
यक्ष,गण,दुय्यम देवता,प्रधान देवता,शक्ति चे प्रतीक,किंवा राजाचे शौर्य दाखवायचे म्हणुन पायदळी ठेवलेले हत्ती अश्या विविध ऐतिहासिक दस्तावेज लेखक प्रस्तुत करतात.
कुशाण काल मधील मुर्तीकला ते गुप्तकालीन हिंदू मंदिरांची बांधणी,मुर्तिकलेचा झालेला भरभराट,गणेश मुर्तीमध्ये झालेले वेळोवेळी बदल आपल्याला कळतात. गणेश आणि शक्ती ,गणेश आणि नृत्यकला, दोन हात ते 16 हात असा प्रवास,काळानुरूप बदलणारे संदर्भ वाचताना थक्क व्हायला होते.
गणेश याचे स्वतः चे गुणधर्म,विघ्न करता आणि विघ्नहर्ता अशी ओळख होती. विघ्न करता कारण तो कार्यात विघ्न निर्माण करतो आणि त्याची पूजा करून शांती केली म्हणजे विघ्न टळते. गणेश हा एकाच वेळी चांगला आणि वाईट आहे.बौद्ध धर्मात त्याचे असे चित्रीकरण बहुतांश मुर्ती कलेत केले गेले आहे.
तांत्रिक गणेश
गुप्तोत्तर काळात भारतात तांत्रिक पंथाचा उदय झाला.त्यात गणेशाला महत्त्वाचे स्थान होते. शक्ती आणि गणपती यांच्या एकत्रित उपासनेचा प्रघात होता. त्यांना या पंथात खूप मोठे स्थान होते.दहाव्या शतकामध्ये शक्ती गणपतीची नवीन ध्यान निर्माण झाली (उद्दिष्ट गणपती ,महागणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, लक्ष्मी गणपती, शक्ती गणपती)
बौद्ध गणेश
बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात मुर्ती पुजा केली जात नसे. परंतु कुशल काळानंतर त्यामध्ये मुर्ती पुजा सुरू झाले असेल मान्य आहे. बौद्ध कलेत गणेशाला दुय्यम स्थान दिले असून काही देवता त्याला पायाखाली तुडवत दाखवितात.या साधनेमध्ये अपराजिता गणेशाला तुडवत असते असे वर्णन आहे. तसेच बौद्ध गणेशाच साधन माला, निष्पन्न योगावली आणि धर्मकोष ग्रंथात देखील उल्लेख आहे. बौद्धांच्या वज्रयान या तांत्रिक पंथाचा गणेश एक महत्त्वाचा भाग होता.एका नेपाळी bronze मुर्तीत मंजुश्री ही देवता गणेशाला पायाखाली तुडवत दाखवली आहे.तिबेट मध्ये देखील मंजुश्री आणि परमेश्वरी या देवतांच्या पायाखाली गणेशाला दाखवण्यात येते. परमेश्वरी ही बौद्ध देवता आहे. चंद्र विनायकाच्या प्रतिमा नेपाळ आणि तिबेटमध्ये आढळून येतात. त्या भारतामध्ये क्वचितच दिसतात. काही प्रमाणात पुर्वभारतात दिसतात.
जैन गणेश
जैन धर्मियांनी गणेशाला त्यांच्या पंथात महत्त्वाचे स्थान दिले होते. भारतातच तो सीमित राहिला आणि आजही सुस्थितीत टिकून आहे. गणेशाच्या जैन पंथातील मुर्त्या खूप थोड्या आहेत.विघ्नहर्ता असल्यामुळे त्याचा समावेश करण्यात आला असे मानले जाते. पार्श्वनाथ मंदिरात गणेशाची मूर्ती आहे.तसेच जैन ग्रंथात गणेशाची हेरंब ,विघ्नेश, विनायक ,एकदंत,लंबोदर इत्यादी नावे घेतली जातात. जैनांचे 24 तीर्थंकर आणि त्या प्रत्येकाला त्याचा यक्ष आणि अक्ष असते. त्यापैकी एक यक्ष गजमुख्य असतो त्याला गणेश असे समजले जाते. तो पार्श्वनाथांचा यक्ष आहे. पार्श्वनाथ हे 23 वे तीर्थंकर होते आणि अतिशय लोकप्रिय होते. यक्ष पार्श्व गजमुखी असे त्याचे वर्णन जैन ग्रंथांमध्ये आहे.गोमुख नावाचा आणखीन एक जैन यक्ष गजमुखी आहे. तो तीर्थंकर आदिनाथ यांचा यक्ष आहे.पूर्ण भद्र हा यक्ष सुद्धा गजमुखी आहे.भगवान महावीरांचा एक शिष्य गौतम स्वामी हा सुद्धा गणेशाचे रूप समजले जातो. दिवाळीच्या उत्सवात त्याची पूजा केली जाते.खंबात जे आज गुजरात मध्ये आहे तेथे चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर आहे.त्यामुळे गणेशाला चिंतामणी हे नाव पडले अशी आख्यायिका आहे.
प्रकरण तिसरे प्रसार-गणेश ते महा गणेश
गणेशाचे विविध कालखंडातील रूप,त्या त्या भौगोलिक भागानुसार झालेले मुर्ती कलेतील बदल हे देखील खूप वाचण्यासारखे आहे. त्याचे विविध पंथांमध्ये किंवा धर्मांमध्ये झालेले रूपांतरण पण त्याचा मुळ गाभा सांभाळून केलेले त्याचे प्राकृतिक किंवा शारीरिक मुर्ती कलेतील बदल हे सुद्धा खूप वाखाणण्याजोगे आहे.
भारतातील वाराणसी येथील प्राचीन गणेश मंदिरे,तमिळनाडूमधील रामनाथपुरम येथील प्राचीन मंदिरे,महाराष्ट्रातील अष्टविनायक,गणेश गीता, गणेश सहस्त्रनाम,हेरंब गणपती इत्यादी गणेशाची भारतातील रूपे ,स्थानानुसार त्यात झालेले बदल, राजवटीनुसार झालेले मंदिर आणि मुर्ती मधील संस्करण अतिशय वाचण्यासारखे आहे. गणेश पुराण,मुद्गल पुराण या पुस्तकांचा संदर्भ गणेशाला समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो.
आशियाई देश आणि गणेश
भारतीय उपखंडाच्या वायव्य सीमेपासून (सध्याचा अफगाणिस्तानचा परिसर), मध्य आशिया, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका( पोलन, निरहुआ),आग्नेय आशियातील म्यानमार किंवा ब्रह्मदेश,
थायलंड,कंबोडिया (प्राचीन चंपा देश),Laos,ताजाकिस्तान उझबेगिस्तान,कजाकिस्तान,रशिया,मंगोलिया इत्यादी देशांमध्ये गणेशाच्या विविध आकर्षक मुर्त्या आहेत ज्या संग्रहालयात योग्य पद्धतीने संवर्धन केल्या आहे. गणेशाची सर्वोत्कृष्ट आणि भव्य मुर्ती मिसोन (Laos) येथे आहे.
महाविनायक ही काबुल येथील संग्रहालय मध्ये एक सुबक मुर्ती आहे. अफगाणिस्तान मुर्तीकलेमध्ये ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव जाणवतो.
नेपाळमध्ये हिंदू आणि बौद्ध शिल्प पद्धती आढळतात. काठमांडूखोर्यात त्या जास्त आहेत.सूर्य विनायक,विघ्नेश्वर,विघ्नांतक, हेरंब गणपती, महाकाल गणपती, मंजुश्री,पायाखाली गणेश ही काही प्राचीन रूपे आहेत.
"आग्नेय आशियातील गणेशाच्या हातात मोदकपात्र भारतातल्याप्रमाणे पूर्ण भरलेले नसते हे नमूद करणे आवश्यक आहे. बऱ्याचशा मूर्तींमध्ये ते मोदक पात्र रिकामे दिसते.परंतु सोड तिकडे वळलेले असल्यामुळे मोदक खाऊन झालेले असावेत अशी समजूत आहे.भारतामधील गणेशाच्या हातामध्ये मोदकाने भरलेले पात्र दिसते".
चीनमध्ये गणेशाच्या प्रतिमा इसवीसन सहाव्या शतकापासून नव्या शतकापर्यंतच्या काळात आढळतात आणि त्यानंतर त्या अजिबात कुठेही पाहायला मिळत नाही. त्यानंतर त्या पुन्हा अठराव्या शतकात दिसतात. यातुन एकच निष्कर्ष काढता येतो की गणेशाला मधल्या काळात लोकप्रियता लाभली नव्हती. येथील मूर्ती वरती बौद्ध शैलीचा प्रभाव दिसतो.
बाली तसेच इंडोनेशियातील विविध बेटांवर गणेश मुर्ती आढळून येतात. इंडोनेशियामध्ये मुर्त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मागच्या बाजूस कीर्तीमुख कोरलेले आहेत. कीर्तीमुख भारतात गुप्त काळापासून इसवीसन पाचवे शतक दरम्यान सुरु झाले. इंडोनेशिया मध्ये खुप भव्य मुर्ती देखील आहेत. त्या उघड्या वर आहेत कारण मंदिर बांधलेले नाहीत. त्यामुळे त्यांना संपूर्ण प्रदक्षिणा घालता येते. काही विद्वानांच्या मते त्या मांडवात ठेवलेल्या असाव्यात. इंडोनेशियामधील काही मुर्ती मध्ये सोंड उजवीकडे वळलेली दिसते. पण भारतात हे क्वचित आढळते.कारण उजव्या सोंडेचा गणपती कडक समजला जातो.
एक मूर्ती हॉलंड मधील लायडन शहरांमध्ये आहे.तिच्या अंगावर भरपूर अलंकार आहेत. Munich जर्मनीत मधील गणेश मुर्ती अतिशय प्रमाणबद्ध आहे.
बोर्नियो म्हणजे प्राचीन वरुण द्वीप येथे देखील गणेशाच्या विविध मुर्त्या आढळून येतात.
जपान मध्ये देखील गणपती अतिशय लोकप्रिय आहे.चीन मधून गणेश पुजा जपान मध्ये आणली गेली असे म्हणतात.अनेक बौद्ध ग्रंथ जपान मध्ये गणेशाचा उल्लेख करतात.गणेशाची चित्रे आपल्याला अनेक ठिकाणी जपानमध्ये दिसतात.जपान मध्ये गणेश गणेश विनायक, शोडेन आणि कांगी तेन नावाने ओळखला जातो.
मध्य आशियातील गणेशाच्या चित्रांवरून एक गोष्ट उघड होते की तेथे देवाचे मुर्ती विज्ञान भारतापेक्षा वेगळे होते. त्याची आखूड सोंड,अलंकार आणि वेशभूषा ही निराळी आहे.हे अर्थात स्वाभाविक आहे.महत्त्वाची गोष्ट ही आहे की मध्य आशयासारखा वैराण भूमिती गणेश हा लोकप्रिय देव होता.
मंगोलिया मध्ये गणेश पूजा पोचली तिबेटी भिक्षू पांग्स पा मुळे. मंगोलियात गणेश लोकप्रिय होणारे मुख्य कारण तेथे महाकाल हे शिवाचे स्वरूप समजले जाते. शिवाचा पुत्र गणेश त्यामुळे त्याला तेथे सहज मान्यता मिळाली. नृत्य गणेशाच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच मंगोलियन गणेशावर चौदा ग्रंथ आहेत.
उणीव
पुस्तक कधी कधी एक सुरी होते. पण विषय किचकट आहे आणि थोडा टेक्निकल त्यामुळे ते टाळणे अवघड आहे.
समारोप
असे हे गणाधीशाचे पुस्तक अतिशय वाचण्यासारखे आहे. प्रत्येकाने एकदा तरी आपल्या या आराध्य दैवताला अधिक वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी जरूर वाचण्याचा प्रयत्न करावा. हा पुस्तक परिचय आपल्याला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.
Comments
Post a Comment