द मोटरसायकल डायरीज
द मोटरसायकल डायरीज
लेखक अर्नेस्टो चे गवेरा
अनुवाद अमृता देशपांडे
मधुश्री पब्लिकेशन
मराठी प्रथम आवृत्ती ऑगस्ट 2022
दुसरी आवृत्ती ऑक्टोबर 2023
ISBN 9788195377251
मुल्य 300/-
पृष्ठ संख्या 257/-
अर्नेस्टो चे गवेरा म्हणजेच चे हा एक अतिशय प्रसिद्ध क्रांतिकारी आणि जगभरात नावाजलेले व्यक्तिमत्व. जेवढे प्रेमळ तेवढेच वादग्रस्त.परंतु याचे एक वेगळे रूप आपल्याला द मोटरसायकल डायरीज या पुस्तकातून बघायला मिळते. मोटरसायकल डायरी यावर अनेक चित्रपट आणि अनुवाद देखील झाले आहेत.मराठी अनुवाद अमृता देशपांडे यांनी केला आहे.
चे आणि माझी ओळख स्पॅनिश भाषा शिकताना झाली. आणि ह्या पुस्तकात गट्टी झाली.
तसं पाहिलं तर चे हा सगळ्यांना क्युबन क्रांती द्वारे माहिती आहे.परंतु एका क्रांतिकारी होण्याआधी तो एक साधासा मेडिकल ग्रॅज्युएट होता. 23 व्या वर्षी (1951 -52) आपला मित्र Alberto ग्रॅनाडो( एक बायोकेमिस्ट) सोबत त्याने जवळपास संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड आपल्या मोटरसायकलवर पालथा घातला. त्यांची मोटरसायकल जेव्हा खराब होते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून लिफ्ट घेत,मिळेल त्या ट्रकमध्ये,ॲमेझॉन नदीमध्ये तराफ्यातनं त्यांनी अतिशय खडतर असा प्रवास केला आहे.
परिचय
पुस्तकाच्या सुरुवातीला चे ची मुलगी अलायदा गवेरा - मार्च हिची प्रस्तावना आपल्याला वाचायला मिळते.
सुरुवातीची काही पाने आपल्याला चे च्या दैनंदिनी सोबत जुळवून घेण्यात जातात. कधी कधी पुस्तक बंद करावेसे पण वाटते पण साधारणतः 45 ते 50 पाने झाल्यानंतर ते आपल्या मनाची पकड घेते आणि अगदी शेवटचं 250 व पान संपेपर्यंत आपल्याला अगदी धरून ठेवत.
चे भुकेला असतो तेव्हा आपल्याला पण भूक लागते. अर्नेस्टोला मार लागतो किंवा त्याचं भांडण होतं, ते आजारी पडतात तेव्हा आपल्याला सुद्धा त्यांच्या आजारपणाची जाणीव होते.इतक्या प्रगल्भपणे अमृताजींनी याचा अनुवाद केला आहे. ही त्यांच्या लिखाणाची समृद्धी आहे.
एक मेडिकल ग्रॅज्युएट आणि बाय केमिस्ट यांची भन्नाट जोडी वेगवेगळ्या खडतर परिस्थिती मधून कशा पद्धतीने हा प्रवास करते आणि दक्षिण अमेरिकेचे एक वेगळच रूप आपल्याला दाखवते.हे अफाट आहे.
यामध्ये आपण वसाहतवादी स्पॅनिश, ब्रिटिश आणि त्या त्या देशातील मूळ राहिवाशांचे भेटतो.दक्षिण अमेरिका आणि स्पॅनिश भाषा असा एक साधारण समीकरण बघितल जाते. परंतु दक्षिण अमेरिका खंडातील प्रत्येक देश आपला स्वतःच असे एक वैशिष्ट्य जपुन ठेवतो आणि असे अनेक भाग आहेत जिथे आपण सामान्य प्रवासी जात सुद्धा नाही.ते भाग आपल्याला चे आणि Alberto दाखवतात. ते विविध भागात जाऊन डॉक्टरांना भेटतात जे त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांवरती शस्त्रक्रिया व उपचार करून त्यांच्या वसाहती वसवण्यात यशस्वी होतात.
अनेकदा खूप अनपेक्षित घटना देखील घडतात.एका ठिकाणी रात्री ते आडोशाला ते थांबले असतात. त्या भागात रानटी प्राणी हल्ला करतात हे त्यांना माहिती असतं. ते खोक्यात झोपले असतात.रात्री असाच एक आवाज खूप दुरून त्यांना यायला लागतो. दोघ घाबरतात आणि घाबरण्याच्या त्या रिफ्लेक्स किंवा सेल्फ डिफेन्स मध्ये बंदुकीने गोळी झाडले जाते. सुरुवातीला असं वाटतं एखादा मोठा अस्वल मारल गेल. परंतु तो त्यांचा आश्रय दात्यांचा मुलगा असतो.तो रक्ताच्या थारोळात पडला असून त्याचे आई आणि बाबा रडत असतात. त्यांना गावातून हुसकून देतात. तरी प्रवास चालु राहतो.
चे ने काढलेले फोटो आपल्याला त्या काळाची खूप चांगली कल्पना देतात. फोटो जरी अस्पष्ट असले तरी चे च देखणे पण प्रत्येक फोटोमध्ये नजरेत भरते.
अनेक ठिकाणी ही दोघे दारू पिऊन दंगा,भांडणे करतात. प्रसंगी मिळेल ते काम करून पैसे जोडतात,फाटका खिसा घेऊन बार्गेन करून ट्रक वाल्यांकडून लिफ्ट घेतात.अनेकदा अतिशय उत्तम पाहुणचार अनुभवतात तर काही रात्री उपासमारीने घालवतात.मोकळ्या आकाशाखाली झोपतात किंवा वाळवंटामध्ये जोडीने झोपतात. एकमेकांना कशीतरी मिठी मारून थंडीवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात एकाच पांघरूण मध्ये.अमेझॉनच्या जंगलांमधून प्रवास करताना डासांनी फोडले जातात. मलेरियाची भीती असते. वारंवार इन्फेक्शन देखील होते.
जेव्हा चे पेनिसिलिन घेऊन बरा होतो तेव्हा आजच्या या मॉडर्न जगातल्या डॉक्टरला (मला)धक्क्या पेक्षा कमी नसतं. जिथे आम्ही सुपर बग पाहतो तेथे हे फार सुखकर वाटते. चे ला बाल दमा असतो.त्याचा दमा विविध परिस्थितींमध्ये वाढतो. वेळोवेळी तो adrenaline आणि aspirin घेतो व बरा पण होतो. इच्छाशक्ती आजच्या मॉडर्न ट्रीटमेंट पुढे किती फिकी होते याची जाणीव होते.त्याच्या दम्यावरती मात करत एवढ्या धुळीने माखलेल्या खाणी,देश, वेगवेगळे थंड व गरम प्रदेश, रेन फॉरेस्ट, ॲमेझॉन सारख जंगल तो धाडसाने पार करतो.एका फ्रेंच कंपनी च इन्हेलर चे वापरतो तेव्हा आजकालच्या पिढीतल्या मला ते फार सुरुवातीच्या स्टेजमध्ये असणार याची जाणीव होते.माझा मेडिकल शास्त्र विषयीचा आदर कैक पटीने वाढतो.
चे आणि Alberto एक वेगळाच माणुसकीच दर्शन घडवतात. कधी ते अतिशय गरीब लोकांना आपल्या हातातलं वस्तू, पैसे देतात. एखाद्या घाबरलेल्या कुत्र्याला स्वतः सोबत प्रवासात सामील करतात. त्यांची गाडी पोदेरोसा खराब होऊन कोसळते तेव्हा आपल्याला देखील आपल्या जवळचे कोणीतरी व्यक्ती मागे राहिले याची जाणीव होते.
Alberto ग्रॅनाडो यांच्यासोबत आपण देखील वेताळासारखा चे च्या पाठीवर बसतो आणि या सफरीमध्ये सामील होतो.जेव्हा ते फळकुटावर बसतात, आपण पण फळकुटावर बसल्याचा भास होतो. ते ट्रकमध्ये धक्के खात असतात तेव्हा आपणही धक्के खातो.
चे विविध देशातील माणसांचा दैन्य,पारतंत्र,शोषण गुलामगिरी याचा सुद्धा जवळून निरीक्षण करतो. कामगारांचे होणारे हाल, तब्येतीची हेडसाळ,भांडवलवादी आणि वसाहतवाद्यांचा असलेला माज,खाण कामगारांचे होणारे शोषण, खाणीच्या मालकांचे तिथला निसर्ग ओरबाडून घेण्याची वृत्ती याच्या बद्दल चे अतिशय परखडपणे बोलतो. त्याच्यातील क्रांतिकारी आपल्याला दिसतो.
चे अर्जेंटिना मध्ये अँडीज पर्वत ओलांडून पेरू,बोलिविया,ब्राझील या देशांमध्ये फिरतो.तो इनकाच्या भूमीला सुद्धा जातो. रेल्वेने व ट्रकने प्रवास करतो. वेगवेगळ्या ठिकाणी पंक्चर झालेला गाड्या,नसलेला रस्त्यांवरून चालणाऱ्या ट्रक बद्दल बोलतो. इंडियन्स बद्दल सांगतो ज्या तिथल्या मूळ जाती आहेत.तसेच इतरही आदिवासी जाती बद्दल सांगतो. त्यांचं स्पॅनिश बद्दल असलेले अज्ञान ,आपल्या रीती बद्दल असलेले प्रेम समजते.
ह्या प्रवासानंतर चे पेरू,इक्वाडोर,पनामा,कोस्टारिका इत्यादी देशांच्या प्रवासाला निघतो. त्यादरम्यान तो फिडेल कॅस्ट्रो याच्या संपर्कात येऊन क्युबन क्रांती मध्ये भाग घेतो. क्रांती यशस्वी झाल्यानंतर तेथे ते लोकशाहीचे सरकार स्थापन करतात.त्यात चे अतिशय महत्त्वाची गृहमंत्र्याची भूमिका निभावतो. परंतु चे च्या कामाच्या पद्धती अनेकांना तेथे आवडत नाहीत.तसेच त्याला जाणवते की इतरही अनेक देशांना त्याच्या मदतीची गरज आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. त्यामुळे एक पिस्तूल आणि काही मोजके साहित्य घेऊन तो मेक्सिको मध्ये जातो. तेथे स्वतंत्र लढ्यात भाग घेतो. तसेच तो आफ्रिकेतील ही अनेक देशांना स्वातंत्र्यलढ्याची मोहीम आखण्यात मदत करतो. चे चे वाढते वर्चस्व अमेरिकेला न पटल्यामुळे बोलिवियाच्या क्रांतीमध्ये चे पकडला जातो.त्याचे कुठल्याही योग्य पद्धतीने कोट मार्शल न करता गोळ्या घालून हत्या केली जाते. अनेक वर्ष त्याच्या अस्थी मिळत नाहीत.परंतु त्यांचा पुन्हा शोध घेतला जातो आणि त्या पुन्हा क्यूबाकडे समर्पित केल्या जातात.8 ऑक्टोबर हा दिवस गुरीला दिवस म्हणून पाळला जातो चे च्या स्मरणार्थ.
आपल्या कारकिर्दीमध्ये चे हा युनायटेड नेशन्स मध्ये एक अतिशय गाजलेले भाषण देतो.पुस्तकाच्या शेवटच्या भागात चे चे मेडिकल विद्यार्थ्यांना संबोधन केलेले एक भाषण खूप स्फुरण देणारे आहे. चे त्याच्या कारकिर्दीमध्ये भारताला सुद्धा भेट देऊन गेला आहे.
सारांश
चे चे आयुष्य एकदंत कथा होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. की या प्रवासानंतर तो क्रांतिकारी झाला त्याची पाळमूळ निश्चितच या प्रवासामध्ये होती.चे एक दंतकथा आहे,चे क्रांतिकारक आहे,चे सच्चा माणूस आहे.
असा हा सुंदर मोटरसायकलचा प्रवास खरच वाचण्याजोगा आणि अनुभवण्या सारखाच आहे.धन्यवाद.
Comments
Post a Comment