इंजिनीयर घडवताना.... एक अनुभव संपन्न प्रवास
इंजिनीयर घडवताना.... एक अनुभव संपन्न प्रवास
लेखक शैलेश कुलकर्णी
प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन कोल्हापुर
मुखपृष्ठ गौरीश सोनार
प्रथम आवृत्ती 1 मे 2026
ISBN 978-81-685422-1-1
मुल्य 450/-
पृष्ठ संख्या 292
संक्षिप्त परिचय
शैलेश कुलकर्णी एक हाडाचे शिक्षक. 33 वर्ष इंजिनिअरिंगच्या मुलांना खाजगी शिकवणी द्वारे गणित आणि इतर अभ्यासक्रमातील विषय शिकवण्याचे कार्य डोंबिवली परिसरात करतात. हे लिखाण फेसबुक आणि इतर माध्यमातून वाचण्यात आले होते. परंतु एकसंध वाचताना अधिक मजा येते आणि एक प्रकारचे सूत्र जुळासारखे वाटते.शैलेशजींनी मनमोकळेपणाने आपला शिक्षक होण्याचा प्रवास सादर केला आहे. योगायोगाने या क्षेत्रात आलेले आणि हातात सरकारी नोकरी असताना देखील ह्या अस्थिर कार्यासाठी आयुष्यभर झटले.इतकी वर्षे टिकणे पोरखेळ नाही. अनेक भलेभुरे अनुभव,परिवार आणि कार्यक्षेत्रात आलेल्या अडचणी या सगळ्यांची गाथा म्हणजे हे पुस्तक.पुस्तकाला प्रस्तावना आपले समूह सदस्य आणि प्राऊड डोंबिवलीकर चंद्रशेखर टिळक सरांची लाभली आहे.पुस्तकाची पाठ राखण प्राध्यापक डॉक्टर विनय भोळे यांनी केली आहे. पुस्तकाच्या प्रकाशिका आपल्या समूह सदस्य भाग्यश्री मॅडम ( भाग्यश्री प्रकाशन) यांनी केले आहे.
सविस्तर परिचय
शैलेश कुलकर्णी हे डोंबिवलीकर.इंजीनियरिंग झाल्यानंतर नोकरीत स्थिर होत होते. तेव्हा त्यांना एका क्लासमध्ये शिकवण्याचे आमंत्रण येते. ते शिकवतात आणि आपणही शिकवू शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळतो. परंतु त्या क्लासमध्ये त्यांच्या कष्टाचे पैसे वेळोवेळी न देता फसवणूक होते. या क्षेत्रातील पहिला चटका त्यांना बसतो. पण न हरता ते वसुली तर करतातच आणि कुलकर्णी'ज क्लासेस ची सुरुवात होते.
पुस्तक चार भागात विभागलेले आहे. पहिल्या भागामध्ये क्लासेस श्री गणेशा ते काळानुरूप बदल ह्यावर प्रकाश टाकतात. भाग दोन मध्ये ते आपल्या खास आठवणीतील सहयोगी शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल लिहितात. भाग तीन त्यांना आलेल्या शिक्षण क्षेत्रातील चित्र विचित्र अनुभवांबद्दल लिहितात. भाग चार अवलोकन करत या शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अनेक आवाहनांबद्दल सूतोवाच आहे. ऑनलाइन शिक्षण ,बदलता शिक्षक वर्ग आणि जाहिरातींचे विश्व,स्वायत्त संस्था /अभिमात विद्यापीठे प्रवेश प्रक्रिया आणि सत्य हे निर्भीड पद्धतीने मांडतात. स्वायत्त महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठे याबद्दल मोलाची पारदर्शक माहिती पुस्तकात आहे.
छोट्या जागेपासून मोठ्या जागेत झालेले स्थलांतर आणि सतत होत गेलेली सुधार ह्याचे सुंदर शब्दांकन केले आहे. त्यात आलेल्या अडीअडचणी, निंदकाचे घर असावे शेजारी अनुभव,चांगले वाईट सहकारी,कामगार, पिढीनुसार बदल होत गेलेले विद्यार्थी/ विद्यार्थिनी, यश अपयश, प्रेम/भंग, पालक हा प्रवास ते मन मोकळं लिहितात. काहींची नावे त्यांनी बदलली आहेत.पण अनुभव स्पष्ट लिहिले आहेत न दुखवता.
त्यांच्या वडिलांचा अनपेक्षित वियोग हे प्रकरण मनाला चटका लावून जाते.त्यांच्या पत्नी,आई आणि भावाने दिलेली भक्कम साथ हे परिवार सुसंवाद दर्शवतात.परिवार आणि कार्यक्षेत्र सांभाळताना होणारी तारांबळ,नोकरी आणि क्लास सांभाळत केलेली कसरत,
काटेकोर नियोजन अप्रतिम.
आजच्या काळात जेव्हा बाईजू ,फिजिक्स वाला सारख्या व्यावसायिक संस्था मार्केटमध्ये येऊन शिक्षणाचे बाजारीकरण करत पालकांचे आर्थिक शोषण करतात. दर्जा सुमार असतोच. त्या बद्दल वाच्यता कमी होते.परंतु लेखक आणि टीम काळानुरूपी सुयोग्य बदल करत परिस्थितीचे योग्य भान ठेवत मुलांना मुख्य शिकवण्याच्या कार्यामध्ये झोकून देतात तेव्हा खूप बरे वाटते.
ज्ञानदान हे एक फार पुण्याचे कार्य आहे.त्याला व्यावसायिक जोड देणे हे काळाची गरज आहे. परंतु त्यात पालक आणि विद्यार्थी ओरबडले न जाता सोबत शिक्षकांचे आर्थिक नुकसान न करता हा व्यवसाय चालवण्याचे हे तंत्र लेखकाला गवसले आहे. त्यांच्या लिखाणामध्ये एक प्रामाणिकपणा झळकतो.
अनेक व्यवसायातील चुका किंवा अनुभव त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करत मांडले आहेत. फी साठी मागे लागणे, पालकांकडून होणारी फसवणूक, मुलांच्या खोट्या कहाण्या हे सगळे मला देखील एक शिक्षक म्हणून कुठेतरी पटले. तसेच काळानुरूप होत जाणारे शिक्षण पद्धतीत बदल हा त्यांनी खूप स्पष्टपणे लिहिला आहे.एका बैठकीत पुस्तक संपवावेसे वाटते. हे ह्या लिखाणाचे यश.
या पुस्तकात आपले अनेक समूह सदस्य भेटतात. जसे आपले बॅकबेंचर आशिष पाटील जी. आपल्याला नेहमी एक हसतमुख व्यक्ती म्हणून दिसतात (तुम् इतना क्यू मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो).परंतु त्यांना झालेले वियोग वाचताना खुप वाईट वाटते. जलप्रवास करणारे प्रधान सर पण भेटीस येतात.
मार्ग दर्शक तत्त्वे
ज्यांना स्वतःचा खाजगी क्लासेसचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा प्रत्येक शिक्षकासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक आहे.क्लासेस मध्ये शिक्षक वृंद किंवा सहाय्यक शिक्षक निवडताना काय निकष असावे ,क्लासेसचे डॉक्युमेंट्स कसे ठेवावेत, आपल्या सहकारी सोबत कामाची नियमावली कशी असावी इत्यादी...
पालकांची आणि विद्यार्थ्यांची काळानुसार बदललेली मानसिकता, शिक्षण संस्थांचे बदलत चाललेले स्वरूप, कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्याआधी घ्यायची योग्य काळजी,भेड चाल मध्ये न जाता व्यवस्थित सगळे मुद्दे तपासूनच क्लासेस मध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्याची पद्धत,ऑनलाईन आणि ऑफलाइन कोचिंग, त्याचे फायदे तोटे यावर ते सविस्तर लिहितात.
कुठलाही उपक्रम हा सुरू करणे फार सोपे असते.परंतु त्या टिकून राहणे आणि स्वतःला टिकवून ठेवणे अवघड. स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहणार हे किती महत्त्वाचं आहे ह्याचे महत्त्व अधोरेखित होते. मार्केटिंगचे विविध पर्याय, काळाच्या ओघांमध्ये कसे टिकून राहावे याचे देखील हे पुस्तक खूप चांगले मार्गदर्शन करते.चकचकीत जाहिरातींच्या आहारी न जातात त्यांच्या मागचा खरा चेहरा जाणून घेण्यास हे पुस्तक आपल्याला शिकवते. साधा फळा ते डिजिटल क्लासरूम हा प्रवास आपल्याला शैलेश जी खूप सुरेख पद्धतीने समजावतात. आपल्या कार्याचा सुयोग्य विस्तार कशा पद्धतीने करायला पाहिजे याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे. काळाच्या ओघात स्वतःची पावले घट्ट रोवून उभे राहणार किती महत्त्वाचा आहे ते हे पुस्तक शिकवते. जेथे आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही असे वाटते तेथे आपण कशा पद्धतीने बाहेर पडावे हे देखील आपल्याला समजते.
कुठल्याही व्यवसाय प्रवासामध्ये कळत नाही कळत काही सहकारी आपल्या कडून दुखावले जातात आणि कधीही ते का दुखावले गेले हे आपल्याला कळत नाही. त्यातील काही जण आपलेच स्पर्धा होतात. कधी मैत्रीपूर्ण स्पर्धा असते तर कधी कटुता.आगे बढते रहो हेच सत्य.
समारोप
एक अतिशय अनुभव संपन्न आणि आशय घन पण तितकच लळा लावणार हे पुस्तक आहे.आपला एखादा दोस्त आपल्याला टाईम ट्रॅव्हलला घेऊन चालला आहे अशी भावना मनात आली. प्रत्यक्ष घटना समोर घडताना वाटतात.यातील अनेक अनुभव मी वैयक्तिक पण अनुभवलेले असल्याने असेल कदाचित. शिक्षिका म्हणून मला देखील अनेक गोष्टी स्वतःबद्दल सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिकायला मिळाल्या.या पुस्तकाद्वारे व्यक्त न झालेले अनेक अनुभव कदाचित या पुस्तकाच्या दुसरी आवृत्ती मध्ये यावे किंवा एक वेगळेच लेखनमाला सरांनी लिहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. हा परिचय आपणास कसा वाटला जरूर कळवा. प्रतिक्रियांची वाट पाहते धन्यवाद.
Comments
Post a Comment