इंडोनेशायण -चित्र विचित्र रंगांचा एक अफाट पसारा

इंडोनेशायण -चित्र विचित्र रंगांचा एक अफाट पसारा लेखक रवि वाळेकर चंद्रकला प्रकाशन आवृत्ती प्रथम आवृत्ती ऑक्टोबर 2019 मुखपृष्ठ दीपक संकपाळ रेखाचित्रे आयुष वाळेकर ISBN 978-81-933655-8-8 मुल्य 370/- पृष्ठसंख्या 280/- लेखक परिचय रवी वाळेकर एक अवलिया जिप्सी माणूस.लिखाणाची हातोटी आणि तीनशे पान सहजच सह प्रवासी म्हणुन फिरायला नेणारा.आगे क्या ही उत्सुकता कायम ठेवत. हा माणुस मागील जन्मी नक्कीच एक archeologist असणार. कारण ज्या बारकाईने भग्न मंदिरात किंवा पौराणिक इमारती बदल ज्ञान देतो ते अस्सल आणि खिळवून ठेवते.प्रत्यक्ष पाहिल्यास निरस वाटणारी जागा ते जागृत करतात. एक संवाद साधतात असे म्हंटले तरी अतिशयोक्ती मुळीच होणार नाही. ते फक्त देश पर्यटन करत नाहीत तर त्या मातीची संस्कृती ,तेथील सामान्य जन, त्यांचे जीवन ,आयुष्याचे अनेक पदर अलगद उलगडतात. तसेच टुरिस्ट trap पण उघडपणे सांगतात. डोळस पर्यटन आणि मनोरंजन याचा उत्तम संगम त्यांच्या लिखाणातून झळकतो. संक्षिप्त परिचय ह्या पुस्तकात आपण इंडोनेशिया ह्या द्वीप समूह देशाला भेट देतो. 20 दिवसांचा भरगच्च आणि तेवढाच मनसोक्त जगलेले कार्यक्रम अनुभवत आपण रे...वि सोबत प्रवास करतो. (परदेशात त्यांना ह्या नावाने बोलतात. गोड वाटते ते. )बाली म्हणजे इंडोनेशिया या एका गोंडस विचारसरणीचे खंडन हे पुस्तक करते. प्रत्यक्षात हा देश दक्षिण गोलार्धातील 17 हजाराहून अधिक लहान मोठा बेटांचा समूह आहे. बहुसंख्य मुस्लिम धर्म राहत असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपती,राष्ट्रीय विमानसेवेचे नाव गरुडा एअरलाइन्स आणि राजधानीच्या मुख्य चौकात कृष्ण अर्जुनाचा रथाचा भव्य पुतळा, सरस्वतीची सर्वात भव्य मूर्ती अमेरिकेत भेट असे ह्या देशाचे वैशिष्ट्य आहे. इथला सामान्य माणूस सहिष्णू आणि सर्वधर्म समभाव पाळणारा आहे. म्हणूनच इंडोनेशियाचा हा डोळस प्रवास एका जातीवंत भटक्याने केलेला आहे. लेखक वर्षातली वीस दिवस घरदार आणि परिवार भारतात सुखरूप ठेवून मुक्त भटकायला बाहेर निघतो.या पुस्तकाच्या द्वारे प्रथम तो आपल्याला बालीची सफर घडवतो आणि त्यानंतर आपल्याला इंडोनेशियाच्या विविध भागांमध्ये देखील घेऊन जातो जेथे सामान्य भारतीय क्वचितच जाईल. हा सफर खुप मजेदार आहे..आपली संस्कृती जपत सहिष्णुता असणार्‍या इंडोनेशियन लोकांचा परिचय होतो. तरुण पिढी आणि त्यांचे आपल्या रामायण आणि महाभारत ह्या बदल असलेले कुतूहल आणि वाचन सुखावते. शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश तेथे आहे. लेखक कधी वक्ता असतो तर कधी देवाचा डायरेक्ट आशिर्वाद मिळणारा दिव्य आत्मा. अनेक खुमासदार प्रसंग पुस्तक वाचनीय बनवतात. विस्तृत परिचय पुस्तकात 34 प्रकरणे आहेत.पुस्तकातील छायाचित्रे खूप प्रभावी आणि चांगल्या प्रतीचे आहेत. प्रत्यक्ष तिथल्या लोकांना ,संस्कृतीला ,नैसर्गिक सौंदर्याला आपण भेट देतो. रवी यांची खासियत आहे की ते खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने कुठलाही पद्धतीची घाई न करता प्रवासाला निघतात. बाली म्हणजे तीन रात्री चार दिवस असा पॅकेज करून आलेल्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे बाली राज्याच्या बाहेर फारसा काही नाहीये. "असं कर बालीला जा तिथं एक तासात ऑस्ट्रेलिया. उगाच इकडे तिकडे भटकत बसू नकोस" असा फुकट सल्ला त्यांना एका मित्राने सांगितला.त्यांचा एम.बी. ए.चा वर्गमित्र वीस वर्षापासून जकार्त्यात राहतो, पण तो म्हणतो की "जकार्तात येणार तर कशाला येतो? काय आहे बघण्यासारखं. बाली बघ आणि परत जा.यायचं तर ये पण पैसे वाया जातील. " असे अनेक संकुचित विचार ऐकुन सुध्दा त्यांना ह्या देशाचे आकर्षण होते कारण ह्या देशामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. राष्ट्रीय भाषा आहे बहासा इंडोनेशिया.पण ती फक्त मोठ्या शहरात बोलली जाते. प्रत्येक बेटाची भाषा वेगळी. बालीची भाषा निराळी.जावाची सुमात्रात नाही.आपल्या कडे कमीत कमी एका राज्यात एक भाषा चालते. पण इथे इथे जिल्हा नुसार भाषा बदलते. इंग्रजीची वाट लागते. पर्यटन स्थळी थोडीफार चालते. पण इतर सारा उजेड. स्थानिक भाषा जिंदाबाद. कुबडी धरून, हातापायाला प्लास्टर लावून थोडा बहुत प्रमाणात डच देखील आहे. 25 कोटी लोकसंख्या,90% मुस्लिम.भिन्न रहाणीमान. एकी हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.मुस्लिम,बौद्ध ,ख्रिस्ती यांच्या धामधुमीत हिंदू धर्म हजारो वर्ष टिकून राहिला. आता मुख्यत्वे बाली बेटावर आहे. डेम्पासार,उबुड,कुटा,बोरोबुदुर इत्यादी जुन्या पण आखीव हिंदू मंदिरांना लेखक डोळस भेट देतो. तिथे ज्या पद्धतीने ही संस्कृती टिकली आहे ते खरच कौतुकास्पद आहे. फक्त आपले हिंदू देवता किंवा पात्र यांची नावे इथे बाली पद्धतीने आहे. जसं भीमा =बिमा. त्यांना पूर्ण रामायण आणि महाभारत पाठ आहे हे बघून निश्चितच आनंद वाटतो.मजा म्हणजे प्रत्येक मंदिरात परदेशी प्रवाश्यांना तिकिट आहे. रवी यांचे नशीब निश्चितच बळकट आहे.कारण अशा मंदिरात त्यांना प्रवेश मिळतो जिथे भल्याभल्यांना प्रवेश नसतो.अगदी स्थानिक लोकांना सुद्धा क्वचित मिळतो. एक प्रसंग खूप उत्सुकता वाढणार आहे. लेखक मंकी फॉरेस्टला निघतो. मंकी फॉरेस्ट चुकवू नये अशी भेट आहे. त्या भेटीत ते एका कट्यावर विसावतात. तेवढ्यात एक माकड येऊन त्यांच्या अंगावर बसते. छान pose देऊन झाल्यावर मार्गस्थ होते. बाहेर आल्यावर हा किस्सा लेखक पुतू ह्या ड्रायवर ला सांगतो. तेव्हा तो साष्टांग घालतो आणि साक्षात हनुमान देवाने तुला आशिर्वाद दिला असे म्हणतो. लेखक तेथे एक दुर्मीळ शिव मंदिर शोधतो. त्यात त्यांनी केलेल्या बारीक अभ्यासाची झलक दिसते.इतरही अनेक प्रसिद्ध आणि दुर्मिळ मंदिरांचा शोध घेतो. त्यांच्याशी संवाद साधतो जणु. एका स्थानिक बाई सोबत झालेला संवादमुळे अंतर्गत खळबळ होते. चहाच्या शोधत लेखक एका छोट्या दुकानात जातो. सकाळची वेळ असल्याने त्याची मालकीण फुलांची परडी घेऊन पूजा करत असते.ती फुलांची एक परडी टॉयलेट जवळ पण ठेवते. विचारले असता ती म्हणते,"देव कोठून येणार हे आपल्याला कसे ठाऊक..?" एक भारतीय म्हणुन पटणार नाही पण भाव निरागस आहे..लाव (Laos) च्या ट्रीप मध्ये मी पण एक बोटी मध्ये छोटा जिना देवाला चढण्यासाठी ठेवलेला पहिला. हे लोक मूर्ती पूजक नाहीत. ते अध्यात्मिक शक्ति म्हणुन अचिंत्त्य (achinty) चे पूजन आणि भक्ती करतात. शुद्ध भावना महत्वाची. थँक्यू इंडियन ब्रदर ह्या प्रकरणात लेखक स्थानिक मुलींची ऑस्ट्रेलियन नागरिकांना तंबी देऊन सुटका करतात. काही ऑस्ट्रेलियाचे पर्यटक विनाकारण त्या हॉटेल चालवणार्‍या मुलींना त्रास देत असतात. लेखक योग्य तो निर्णय घेत त्यांना खाक्या दाखवून देतो.सध्या परदेशात जे भारतीयांचे वागणे बोलणे सोशल मीडिया वर धुमाकूळ घालते आहे त्यात हे प्रकरण एक फुंकर आहे. उलूवातूच्या मंदिरांमधली माकड आणि त्यांचा व्यवहार मजेदार आहे. प्रवासांचे सामान चोरून नंतर ते एक्सचेंज मध्ये देवाण घेवाण करणारे व्यावसायिक लुटारूच म्हणा. अदृश्य सर्प आणि अदृश्य देव या प्रकरणात आपल्याला बालीच्या विविध मंदिरांची ओळख होते. तानाहलॉट मंदिराचा खूप सुरेख उल्लेख रवी यांनी केलेला आहे. वरुण देवाचे मंदिर. त्यांना लाभलेला रखवालदार आणि त्याचे अनुभव मजेशीर आहेत. कॉफी का जानवर हे प्रकरण खूप मजेदार आहे. सध्या खूप प्रसिद्ध झालेली कॉफी (प्राण्यांच्या फळ खाऊन झालेल्या शीची कॉफी) त्याची बनण्याची पद्धती,ते मळे tourist trap सारखी वातावरण निर्मिती होते. ज्वालामुखी आणि बकेट लिस्ट इंडोनेशिया जागृत ज्वालामुखी साठी प्रसिद्ध आहे. असे जागृत ज्वालामुखी बघायला मिळणे हे नशीब असते.परंतु लेखक गेले तेव्हा अंगुंग ज्वालामुखी नुकताच जागृत झाला होता. त्यामुळे त्याच्या फार जवळ जायला बंदी होती. फार तर दहा किलोमीटर इतक्या जवळ जाता येत होते. एवढ्या दूर येऊन कष्ट करून नीट बघायला न मिळणे हिताचे नव्हते. तरी हिम्मत करून तिकीट काढले जाते परंतु रात्रीपासून अचानक तुफान आणि पाऊस तिथे सुरू झाल्याने अंगुंग सूर्योदय सहल रद्द होते.तेव्हा लेखकाला एक दुसरा पर्याय मिळतो. बातूरचा ज्वालामुखी. बातूर समुद्रसपाटीपासून 1717 मीटर ,चढायलाही सोपा. गाडी बऱ्यापैकी वर जात होती.गिर्यारोहण दीड ते तीन तासाचा होत. त्यामुळे लेखक बातूरचा ज्वालामुखी चढायला जातो.त्या प्रवास मधील शारीरिक दमणूक, त्यांची सहप्रवास असलेली जर्मन बाई आणि प्रत्यक्ष ज्वालामुखी जवळ पोहोचल्यावर मिळालेला आनंद, निसर्ग सौंदर्य आणि बकेट लिस्ट पूर्ण करताना झाल्याचा आनंद आपण सहज साजरा करतो. कोमोडो ड्रॅगन आणि राजकन्या बाली बेटाची सफर पूर्ण झाल्यानंतर लेखक फ्लोरेस बेटावर जाण्यासाठी निघतो. फ्लोरेस बेट हे जग प्रसिद्ध कोमोडो ड्रॅगन असलेल्या बेटावर जाण्यासाठी जवळचे बेट. घोड्यासारखं तोंड, नाकावर असलेली शिंगं, खवलेदार कातडी ,अनेक पायांचा प्रचंड लांब ताकदवर शेपटी असलेला, तोंडातून आग फेकणारा प्राणी आपल्याला ड्रॅगन म्हणुन अपेक्षित असतो. पण प्रत्यक्षात थंड चेहरा,मंदबुद्धी, निर्बुद्धपणाचे भाव, मोठे थंड डोळे ,एकदम निस्तेज चेहरा ,सुस्त शरीर, सापासारखी लांबलचक जीभ,पुढे टोकाला चिरलेली, दर मिनिटाला बाहेर काढून मी जिवंत आहे हे समजण्यासाठी ,कानाच्या ठिकाणी दोन आणि नाकाची भोके जरा लहान आणि गोलाकार, दहा-बारा फूट लांब ,अडीच तीन फूट लांब शेपटी त्याला सरडा म्हणावं का ड्रॅगन हाच प्रश्नचिन्ह पडतो.मोठी मगर म्हणावं तर मगरीचा अपमान व्हावा असा. तरी असे निराशाजनक दर्शन घेऊन निघताना त्यांच्या बोटी पासुन काही फूट दूर एक मादा ड्रॅगन एका बोटीकडे टक लावून बघतयेते.लेखक आणि ग्रुप निघेपर्यंत ती तेथेच टक लावून बसलेले असते. निर्विकार पण कुणाचे तरी वाट बघत असल्यासारखे. यांचे अस्तित्व सुद्धा तिला जाणवत नाही. तेव्हा राजकुमारी आणि तिचा राजकुमार ह्याची कहाणी लेखकाला सुचते. त्याचे सूचक चित्र सुंदर आहे प्रकरण सुरू होते तेव्हा. योगकर्ता प्रसिद्ध भव्य मंदिर हिंदू प्रांमबण(prambnan) मंदिर लेखक आस्वाद घेत दाखवतो. प्रत्येक कोपरा आत्मियतेने बघत दीर्घ सफर घडवतो.पंधरावा शतकापासून पूर्णतः मुस्लिम झालेल्या देशात टिकून राहिलेले हिंदू मंदिर. तसेच बोरोबुदुरचे पण. मंदिर अभ्यासण्यासाठी केलेली तयारी आणि सबुरी कौतुकास्पद आहे...ह्याच दरम्यान देवा गणेसा च्या जन्म कहाणी पासुन आपले पुराण,हिंदू संस्कृती इत्यादी माहिती लेखक इंडोनेशियन शाळेतील मुलांना आणि काही तरुणांना सांगतो. चार-पाचशे लोक एक नवीन गोष्ट ऐकण्यासाठी आपल्यासाठी विदेशामध्ये उभे राहतात हे सेलिब्रिटी पेक्षा कमी फिलिंग नसते. बांडुग बांडुग असे कुरूप नाव असलेले पण देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर इंडोनेशियातील पाचगणी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.येथे लेखक हॉटेलमधील एका मुलीच्या काकांच्या होम स्टे राहतो.त्यांच्या सांगण्यावरून तेथे एका गंधकाचे सरोवर आणि गावातील विविध प्रेक्षणीय स्थळांचा आनंद होतो. निघताना काका म्हणतात ,"अरे फार लवकर निघालास.अजून दहा टक्के सुद्धा गाव बघितले नाहीस." हे वाक्य खूप ओळखीचे वाटते. एका एकांतात राहणाऱ्या अनोळखी माणसाला देखील लेखक आपलेसे करतो.आचे ला जाण्याची इच्छा मात्र अपुरी राहते. हे एकमेव राज्य आहे इंडोनेशिया मध्ये जेथे शरियत कायदा कसोशीने पाळला जातो. समारोप असे हे इंडोनेशिया म्हणजे फक्त बाली समजणार्‍या लोकांना सुशिक्षित करणारे ,कोपरखळी देत कंटाळा न येता गुंतवून ठेवणारे पुस्तक नक्की वाचा. परिचय कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. ता.क. संयोगाने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी नुकतेच इंडोनेशिया दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून आले. त्या पार्श्वभूमीवर हा परिचय माझ्यासाठी खुप खास आहे.

Comments

Popular posts from this blog

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

द मोटरसायकल डायरीज

लेडी डॉक्टर्स - वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा