फाईव्ह ए एम क्लब

फाईव्ह ए एम क्लब लेखक रॉबिन शर्मा मराठी अनुवाद डॉ.कमलेश सोमण आणि दिलीप गुप्ते गोगटे इंटरनॅशनल पब्लिकेशन -हार्पर कोलीन पब्लिशर्स लिमिटेड टोरंटो कॅनडा मराठी पब्लिकेशन - जयको पब्लिकेशन हाऊस मुंबई इंग्रजी पहिली आवृत्ती 2018 ISBN 978-93-88423-44-1 मराठी पहिली आवृत्ती 2019 मराठी सहावी आवृत्ती 2022 हे पुस्तक प्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा लिखित आहे.जगभर विलक्षण गाजलेल्या अनेक सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. फाईव्ह एम क्लब या पुस्तकाच्या देखील वीस लाखाहून अधिक प्रती जगभरात विकल्या गेलेल्या आहेत. रॉबिन हे मानव हितवादी,चिंतन करणारे विश्व साहित्यातील एक मोठे नाव आहेत.अनेक विश्वविख्यात अब्जाधीश,व्यावसायिक, सुपरस्टार खेळाडू आणि शंभरहून अधिक कंपन्यांना त्यांनी मार्गदर्शन दिले आहे. त्यांची अनेक बेस्ट सेलर पुस्तके 92 भाषांतून आज जगभरात वाचली आणि गौरवली जात आहेत. रॉबिन शर्मा डॉट कॉम हे त्यांचे संकेतस्थळ आहे. ब्रह्म मुहूर्तावर उठण्याच्या आपल्या भारतीय कल्पनेला रॉबिन यांनी आजच्या युगातील 5 ए एम क्लब असे गोंडस नाव देऊन, आपल्या भारतीय कल्पनांना एक नवीन साज चढवून,आजच्या पिढीपर्यंत आणले आहे. त्याला एका नवीन आलेखन,आजच्या पिढीला आत्मसात करण्यासाठी ते प्रवृत्त करतात. कथानकात एक चित्रकार आणि स्त्री उद्योजिका आहेत. दोघेही वैफल्यग्रस्त जीवन जगत जवळपास आपल्या आयुष्याला संपवण्याच्या निर्णयाप्रत येतात.एका व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात एक धनाढ्य व्यक्ति आणि त्याचा मदतनीस किंवा दोस्त त्यांच्या जीवनात येतात आणि त्यांची आयुष्याची दिशा बदलते. ते फाईव्ह ए एम क्लब चे सदस्य होतात.एका सुखद प्रवासामध्ये सखोल,समृद्ध,स्वतंत्र जगण्याचे ज्ञान त्या दोघांना मिळते.या संपूर्ण प्रयत्नाला फाईव्ह क्लब असे नाव आहे. या पुस्तकांमध्ये एकंदरीत सतरा प्रकरणे आहेत.प्रत्येक प्रकरणांमध्ये जगण्याची एक वेगळी दिशा, विचार आपल्यापर्यंत पोहोचतो. असामान्य प्रतिभाशीलतेकडे नेणारी दिन प्रणाली, 20 20 20 चे सूत्र ,झोपेची आवश्यकता, दहा युक्त्यांचा आधार, उत्कृष्ट कामगिरीची चक्रे,पहाटेच्या वेळेचे महत्व,अजिंक्य पदाकडे होणारा प्रवास, परिवर्तनाची पूर्वतयारी, स्वतःचा जग निर्माण करण्याची प्रवृत्ती, न्यूत्वाला नकार देणे, उत्कृष्ट कामगिरीची दोन चक्रे, अलौकिकतेकडे झेप इत्यादी या पुस्तकातील प्रकरणे आहेत. परिचय या पुस्तकाची सुरुवात आपण एका अशा मुलीच्या दिनचर्याकडे बघत करतो जी आयुष्यात थकली आहे आणि आलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये नाही.कॉर्पोरेट जगतातील लोभस आणि सुंदर चित्राला भुलून त्यात ती सामील होते.परंतु तेथे जाऊन तिला त्यात आपण टिकणार नाही याची जाणीव होते. अनेक प्रश्न तिच्यापुढे उभे राहतात. त्यातून ती कसा मार्ग काढते, फाईव्ह ए एम क्लब विचारसरणी तिला कशा पद्धतीने मदत करते याची ही कथा आहे. या प्रवासामध्ये ते जगभरातील विविध देशांमध्ये जातात.बराचसा काळ मॉरिशस सारख्या सुंदर बेटावरती घालवतात. त्यानंतर ते इटलीला जातात.दररोज ते पाच वाजता सकाळी भेटतात आणि आयुष्यातील विविध गोष्टींबद्दल बोलतात.या पूर्ण प्रवासात ती उद्योजिका कलाकाराच्या प्रेमात पडते आणि त्याला आयुष्यभर साथ देण्याचे वचन देते. तसेच या प्रवासामध्ये उद्योजिका तिच्या व्यवसायातील जे देणगीदार तिच्या मागे लागलेले असतात त्यांच्यापासून तिच्या मनात असलेले भय,व्यवसायात आलेले उतार याला सामोरे जाण्याची शक्ती तिला या फाईव्ह ए एम क्लब च्या माध्यमातून मिळते. निराशाग्रस्त झालेला कलाकार देखील आपल्या कलेचे नवीन कांगोरे शोधण्यास स्वतःला उद्युक्त करतो आणि त्याची कला कशा चांगल्या पद्धतीने तू जोपासू शकतो यासाठी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. या पूर्ण प्रवासामध्ये सकाळी पाच वाजता उठण्याचे फायदे, सकाळी पाच ते सकाळी सहा या साठ मिनिटांमध्ये 20 20 20 या एका प्रचलित सूत्र सोबत ओळख होते. पहिली 20 मिनिटं व्यायाम करणे,त्यानंतरची 20 मिनिटं आपली दैनंदिनी लिहिणे आणि शेवटची 20 मिनिटं ध्यानधारणा करणे किंवा चांगली पुस्तकं/ यशस्वी लोकांची जीवानि वाचणे असे साधारणतः हे सूत्र आहे. हे पुस्तक 66 दिवस एक गोष्ट सतत करत राहण्याचे देखील महत्त्व सांगते. शिव खेरासारख्या अनेक वक्त्यांनी 21 दिवसाचे सूत्र आपल्याला समजावलं आहे.पण हे पुस्तक त्याही पुढे जाते. आपल्याला कोणतीही चांगली सवय पूर्णतः अंगी वळण पाडण्यात 66 दिवस सतत प्रयत्न करत राहिला तर नक्की यश मिळते.यामध्ये तीन टप्पे आहेत.याची आखणी 22 -22 -22 अशा तीन टप्प्यांमध्ये होते.आपण कोणतीही चांगली सवय /कोणते ही चांगले ध्येय साध्य करू शकतो याची जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देत. रॉबिन यांचे वैशिष्ट्य मला असे वाटते की ते शिक्षण किंवा दैनंदिन जीवनातील प्रसंग/अभ्यासाचे टप्पे याची सुरेख सांगड घालतात. ब्रह्म मुहुर्त ला उठणे हे आपल्या पुराणांमध्ये/शास्त्रांमध्ये /संस्कृतीमध्ये आधीपासून प्रचलित आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमध्ये याचा कल कमी होत चालला आहे.वेळी अवेळी चालणाऱ्या पार्ट्या, कामाचा तणाव ,जीव घेऊ स्पर्धा यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील झोपेचे कमी होत जाणारे महत्त्व या सगळ्याला बदलण्यासाठी हे आजच्या पिढीचे पुस्तक आहे. असे म्हटले तरी हरकत नाही की जे जुनं आहे त्याला नवीन मुलांसाठी चकचकीत आवरणात लपेटून जुनं ज्ञान परत वाटलेल आहे. परंतु मांडण्याची जी पद्धती आहे ती आजच्या काळाच्या या पिढीशी सुसंगत आहे.आणि त्यामुळेच हे आजच्या पिढीला एक लाइफ चेंजिंग पुस्तक वाटते. उणीव पुस्तकाच्या 16 पान पुनः मुद्रित झाली आहेत. तसेच थोडे प्रिंटिंग मिस्टेक नीट तपासले नाही आहेत. समारोप असे हे पुस्तक एकदा तरी जरूर वाचावे.सेल्फ मोटिवेशन या श्रेणीतील हे पुस्तक आहे.त्यातील जे योग्य मुद्दे आहे ते लिहून ठेवून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर सुरुवात करण्यास स्फुरण येईल. त्यामुळे आपली प्रगतीच होणार आहे.परिचय कसा वाटला जरूर कळवा.धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

द मोटरसायकल डायरीज

लेडी डॉक्टर्स - वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा