आनंदी बाई रघुनाथराव

आनंदी बाई रघुनाथराव लेखिका:नीला विवेक नातू प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन मुद्रित शोधन: सुषमा देशपांडे मुखपृष्ठ: श्री बा प्रथमावृत्ती: 3 फेब्रुवारी 2024 मूल्य : ₹ 480 ISBN: 978 939464667 पृष्ठ संख्या: 322 सारांश परिचय ध चा मा करणारी आनंदीबाई ही आपल्याला शालेय शिक्षणात सांगितली गेली. परंतु आनंदी चे बालपण, सासुरवास आणि राघोबा दादा गेल्यानंतर तिने सांभाळलेल्या जबाबदाऱ्या आपल्याला ह्या पुस्तकाद्वारे समजतात. नाण्याची एक बाजू आपल्याला इतिहास शिकविते पण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात.नाण्याची दुसरी बाजू दाखवण्यात नीला नातू यांनी आपले कौशल्य पणाला लावले आणि त्यात त्या यशस्वी झाल्यात. 40 वर्षाचा एक मोठा कालखंड हे पुस्तक तीन भागात सांगते.पुस्तकांमध्ये विविध वंशावळ तसेच फोटो दिलेले आहेत.अनेक ऐतिहासिक दस्तावेज पारखून कादंबरी तयार करणे एक मोठे कार्य आहे. सुरुवातीलाच एकही पेशवा का दीर्घायुष्यचा नाही याची कारणे कळतात. सतत केलेल्या मोहिमा,अत्यंत लहान वयात आलेली जबाबदारी, वारे माप खर्च आणि घरातले राजकारण या मुळे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होत गेले. भाऊबंदकीचा शाप हा तर माणसाला पूर्वपारच चालत आलेला आहे. लेखिकेविषयी नीला नातू जी यांची ओळख कराड संमेलन येथे 2025 ला झाली. प्रथमदर्शनी पाहता कोणीतरी मुंबईकर बाई आहेत असे वाटले. सात वाजता व्यासपीठावरती व्याख्यानासाठी उभ्या राहिल्या आणि ज्या तळमळीने 45 मिनिटं आपल्या पुस्तकाबद्दल बोलल्या तेव्हा पुस्तक मनात घर करून राहिले. त्या अगोदर माझे पुस्तक विकत घेऊन झाले होते बाहेर स्टॉल वर. आनंदी बाई बदल दुषित पूर्वग्रह होताच. लेखकाला मदत म्हणून मी पुस्तक खरंतर घेतले होते पण मॅडमच्या लेक्चर नंतर ते पुस्तक तळमळीने पान न पान वाचायचे हे मनात ठरवले.तो योग जुळून आला.कोकणच्या माहेरवाशीणीला न्याय म्हणून लिहायला घेतलेले पुस्तक सच्चा न्याय पुराव्यानिशी देते. नीलाजी चे व्यक्तिमत्त्व फार प्रभावी आहे. मुंबई सोडुन कोकणातील एका गावात येणे, नवऱ्याला मदत म्हणून टेक्निशियन कोर्स आणि हॉस्पिटल लॅबोरेटरीची आवश्यकता पुर्ण करणे,घरात असलेला राजकीय वावर सांभाळत शिक्षण संस्थांना आपल्या देखरेखीत मोठे करणे हे अतिशय मोठे आणि कष्टाचे काम आहे. नीलाजींना बघताना हे निश्चितपणे जाणवले की त्या खंबीर महिला आहेत. त्यामुळे ह्या परिचय सत्रमध्ये त्यांचे पुस्तक घ्यायचेच हे मी ठरवले होते. नीलाजींना सलाम. सविस्तर परिचय पेशवाई पेशव्यांच्या तिसऱ्या पिढीला भाऊ बंधकीचा उपसर्ग झाला आणि मराठी साम्राज्याचा घास खाऊन थांबला.शकुनी महाभारत काळापासूनच आहे. तो एक स्वभाव आहे. रूपक आहे.पेशवे काळात अनेक कारभारांच्या रूपात असे अनेक शकुनी वावरताना आपल्याला दिसतात. नाना फडवीस यांनी 'श्रीमंत स्वारीवर आहेत,बायकांनी चैनीच्या वस्तूंचा वापर करू नये, गुलकंद विड्यांचे सेवन करून नये' असे आगाऊ सल्ले दिलेले पाहून वाईट वाटते. तसेच गोपिकाबाईचा स्वभाव आतल्या गाठीचा..त्यांनी नारायणरावाला सल्ले दिले ते भोवले.कर्मठ वागणे आणि बोलणे, खुला स्वभाव नसणे यामुळे हळूहळू का होईना पेशवाईला ग्रहण लागले.जसजशी पेशवे दरबाराची कागदपत्रे उपलब्ध होऊ लागली तसे आनंदीबाई विषय असलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत झाली. पुण्यात बसलेल्या बैठकीवरच्यांना उत्तरेतील स्थिती कधीच कळली नाही. धर्म, कर्मठ वागणे,उधळपट्टी,उंची राहणे ह्यात किती मेहनतीने आणलेला रोकड असतो हे त्यांना फार उशिरा कळले. पानिपतावर नेलेले बाजार बुणगे ,यात्रेकरू,नियोजनाचा अभाव ह्याचा मोठा फटका बसला. अनेकदा वाटते रघुनाथ रावांना कायमचे उत्तरेत आधीपासून ठेवले असते आणि वेगळी पेशवाई दिली असती तर कदाचित हा पुढचा संघर्ष टळला असता. पुढचा अनर्थ घडला नसता.पण कालाय तस्मे नमः. राघोबादादा अघोरी गणेश याची साधना करतात. त्या वेळी मला माझा पहिला पुस्तक परिचय आठवला. त्यात विघ्न गणेश चा उल्लेख होता. त्याकाळी सवत ही सामाजिक मान्यता प्राप्त पद्धत होती. 40 वर्षीय माणसाचे 10 वर्षांच्या मुलीशी लग्न,नंतर तो अकाली गेल्यावर तिला करावे लागलेले केशवपन,तिच्या सवतीच्या मिश्र मनस्थितीचे खुप प्रासंगिक वर्णन केले आहे. आनंदीबाई रघुनाथराव पेशवे टपोऱ्या डोळ्याची सोज्वळ आनंदी पेशवे वाड्यावर सुखी संसाराची स्वप्न पाहत आली. सुरुवातीला सगळे आलबेल होते. पण मग एक एक खरे चेहरे समोर आले. राघोबादादाच्या विक्षिप्त वागण्याने तिला खुप रोष सहन करावा लागला. पोटच्या अपत्यांना राघोबादादा पासुन सांभाळावे लागले. दत्तक अमृतराव यांनी आनंदीला खुप साथ दिली.त्यामुळे तिच्या दुःखावर एक फुंकर झाली. सुरुवातीचे प्रेमळ राघोबा नंतर कमालीचा मनस्ताप दिलेत.राघोबा दादा सतत डावलले गेल्यामुळे दुखावलेले होते...त्यातून त्यांचा स्वभाव पण बदलत गेला.धरसोड वृत्ती मुळे अनेकदा चुकीचे निर्णय त्यांनी घेतले..नारायण रावला मारायचा निर्णय हा सगळ्यात घातक निर्णय होता. अश्या पद्धतीने संसार करणे हे खरच सतीचे वाण होते. त्याला राजयोग हे गोंडस नाव आनंदाच्या लग्नाआधीच दिले होते.तरी तिने ते शेवटपर्यंत निभावले.पुढील पिढी शक्य तेवढे कर्तबगार करण्याचा पूर्ण प्रयत्न देखील केला. अत्यंत हुषार, चतुर आणि दूरचे बघणारी ही स्त्री. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ शर्करा पाठवून फिरंग्यांशी सुलक नको, तुमची अटकेपर्यंत तळपणारी तलवार आता इतिहास जमा झाले काय अस खोचकपणे विचारणारी,मुलगा दुसऱ्या बाजीराव याच्या नावाने पत्र लिहून पतीला जाब विचारणारी. 'फिरंगीला दौलतीवर येऊ देऊ नका' असा सल्ला कळवते तेव्हा तिची नजर किती मुत्सुद्दी होती हे जाणवते. राघोबादादा आनंदीचे शेवटचे राहिलेले किमती दागिने काढून घेतात.तेव्हा स्त्री धनाची खरे महत्व कळते. नाना फडणीस उरलेले पण दागिने मागतात तेव्हा खुप अपमानित वाटते. त्याकाळी न्यायव्यवस्थेत स्त्रियांना विशेष शिक्षेची तरतूद नव्हती. त्यामुळे करणार्‍या लोकांनी आनंदीबाईचे नाव पुढे करून आपापली मान सोडवून घेतली.खरे तर आनंदीबाईने केले असे जे म्हणतात ते अशक्य आहे.दोष तपासून निवाडा न देता कायद्याच्या पळवाटा शोधून तिला अडकवली. तिला आयुष्यभर आरोपाचा भार सहन करायला लागला.तिला पेशवाई पाहिजे होती तर ती सती निघालेली नारायणाच्या पत्नीला पोटुशी आहेस नाही जाता येणार म्हणत त्याचा वंश वाढू दिली नसतीच. पोटच्या पोरीला दुर केले त्याचे दुःख तिला अवघड होते. शेवट पर्यंत मुलगी दुर्गाबाई हिची आनंदी जवळ भेट होऊ दिलेली नाही..रघुनाथ रावांच्या मृत्यूनंतर एकच महिन्यात दुर्गाबाई चा मृत्यू झाला आहे आणि सवाई माधवराव हा नारायण रावांचा मुलगा आहे की नाही याची ती महत्त्वाची साक्षीदार आहे.पुरंदर वर सोळा गर्भार बायका नेऊन ठेवल्या होत्या. नेमकी काय घटना घडली की एक महिन्याने दुर्गा बाई ह्यांचा मृत्यू झाला? सगळे आनंदीला नक्की अवघड होते. आनंदीबाईने राघोबाच्या 42 नाटक शाळा सहन केल्या. त्यांची राघोबा दादा गेल्यानंतर सुयोग्य जमेल तशी व्यवस्था देखील ठेवली.पोर्तुगीज आणि इंग्रज ह्यांच्या कडे शरण राहिले. तेथे पण ठराविक नाटक शाळा सोबत होत्या. किती म्हणुन त्या माऊलीने सहन करावे. समारोप लेखिका स्त्री मनाचे अनेक कंगोरे आपल्याला दाखवते. माझ्या नंतर आलेल्या मुली वरचढ होऊ नये ह्या कर्मठ दृष्टीने बघणारी गोपिका बाई,प्रेमळ आणि ममत्व असलेल्या काशीबाई, निरागस मुलगी ते अनुभवी आनंदी असे अनेक टप्पे आपणास कळतात.पुस्तकातील अनेक प्रसंग जसेच्या तसे आपल्यासमोर घडतात असे वाटते. राघोबादादा आपल्या छोट्या बाळाला खेळवत असतात. झेला खेळण्याच्या नादात हातातून बाळ सटकते आणि मृत्यू होतो. अमृतरावांच्या पहिल्या पत्नीचे भूत त्यांच्या पायाशी जवळून पहिला प्रहरी बसणे,राघोबादादा आणि अघोर गणपती उपासना,आनंदीचे दागिने राघोबा दादा मागून नेतात,महिला समारंभाचे प्रसंग, आनंदी आणि आज्जी चे लाड इत्यादी आत्मियतेने आणि तळमळीने लिहिले आहेत. प्रत्यक्ष आपण त्या घटनेत सावली बनून वावरतो आहोत असे वाटते. कुठलाही पुर्व ग्रह न ठेवता वाचले तर नक्की खिळवून ठेवते हे पुस्तक.परिचय कसा वाटला जरूर कळवा.धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

द मोटरसायकल डायरीज

लेडी डॉक्टर्स - वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा