जंगल विद्या ट्री टॉप्स

जंगल विद्या ट्री टॉप्स लेखक जिम कॉर्बेट संपादक आणि अनुवादक डॉक्टर कमलेश सोमण गोयल प्रकाशन प्रथम आवृत्ती 4 september 2022 मुल्य 225/- पृष्ठसंख्या 200 संक्षिप्त परिचय जिम कॉर्बेट हे एक महान निसर्ग रक्षक होते. जिम यांनी जंगली प्राण्यांच्या जीवन क्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच पण असंख्य फोटोग्राफ्स काढले.अनेक पुस्तकाद्वारे शहरी माणसाला वन्य जीवन आणि निसर्गाबद्दल सज्ञान केले. त्यांनी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकत माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेले.गडवाल कुमाऊ ह्या नैनितालच्या निसर्गरम्य परिसरात कॉर्बेट यांचे बालपण आणि शिक्षण झालं. त्या काळातच काला ढोंगी गावाजवळ जंगल प्रदेशात शिकारीचा आणि निसर्ग वाचन करण्याचे शिक्षण मिळाले. मूळचे शिकारी असलेल्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवलं की जंगलातील नैसर्गिक वाघ आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे.म्हणून त्यांनी बंदुकी ऐवजी कॅमेरा वापरून वन्यजीवन टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली.1907 ते 1968 या काळात सुमारे पंधराशे लोकांना मारणाऱ्या 19 नरभक्षक वाघ आणि 14 नरभक्षक बिबट्यांची शिकार केली. नरभक्षक वाघ व त्यांची शिकार हे अनुभव पुस्तक रुपात प्रकाशित केले. जिम यांनी लिहिलेले सर्व पुस्तके जगभरात गाजले. जगातील सुमारे 27 भाषांमध्ये त्यांची भाषांतर झाली. ब्रिटिश राजवटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आवाहन दिले. त्यांनी पुढे जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावे यासाठी भारतात जे काही प्रयत्न केले त्याला नक्कीच तोड नाही. जगाला त्याची दखल घ्यावीच लागली. जंगल विद्या आणि ट्री टॉप्स हे जिम कॉर्बेट यांचे शेवटचे पुस्तक. त्यांच्या निधनाआधी त्यांनी लिहिले होते. मुख्य परिचय या पुस्तकामध्ये बारा प्रकरणे आहेत. दोन मुख्य भाग आहेत. ट्री टॉप आणि जंगल विद्या. ट्री टॉप ह्या भागात सुरुवातीला जिम कॉर्बेट यांच्या विषयी थोडक्यात माहिती आहे.त्यांनी केलेले वन्यजीवांचे रक्षण आणि वन्यजीवांना असलेला मानवापासून धोका याबद्दल थोडक्यात माहिती मिळते.जिम यांचे कार्य खूप मोठे आहे.ते काही पानांमध्ये सामावून घेणे अतिशय अवघड आहे.परंतु मनोरंजनासाठी वाघ मारले जायचे त्याचा त्यांनी खूप मोठा विरोध केला आणि फक्त नरभक्षक वाघच मारायचे अशी त्यांनी प्रतिज्ञा केली.आयुष्यभर ती पाळली. हे पुस्तक त्यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ दोन जेव्हा केनियाच्या प्रवासात होती, तेव्हा तिला सांगितलेल्या कहाण्या आणि वृतांत यांचा सारांश आहे. तिच्याबद्दल त्यांनी म्हटले आहे की पहिली आणि शेवटची राणी आहे जी त्या ट्री टॉप वर चढताना एक राजकन्या म्हणून चढली आणि दुसऱ्या दिवशी उतरताना एक राणी झाली होती. कारण त्या प्रवासाच्या दरम्यानच तिला कळाले की तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. जंगल विद्या जंगल कशा पद्धतीने वागते, प्राणी कसे असतात ,त्यांच्या छोट्या छोट्या हालचाली कशा लक्षात ठेवायच्या,आपण प्राण्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्या वाटेला जात नाहीत, निसर्ग आपल्याशी कसा वागतो या अनेक गोष्टी जिम कॉर्बेट यांना एका आदिवासीने शिकवले.हा आदिवासी एक पोस्ट कर्मचारी म्हणून त्यांच्या वडिलांसोबत काम करायचा. त्याने जिमला अरण्यातील भ्रमंतीमध्ये विविध वनस्पती, प्राण्यांची उत्तम माहिती दिली, प्राणी व निसर्गाचे निरीक्षण करायला शिकवले.उपयुक्त आणि अपायकारक वनस्पती ओळखणे,विष्ठा आणि पावलांच्या ठशावरून प्राण्यांचे आकारमान काढणे हे शिक्षण दिले. त्यांना पुढे शिकारीच्या काळामध्ये ह्या ज्ञानाचा खुप फायदा झाला. छोटा जिम आपला भाऊ आणि मित्र-मैत्रिणींसोबत जंगलात घालवलेला वेळ,शिकलेले मूल्य, खाचखळगे,जंगलाची कृपा इत्यादी बद्दल विस्तृत वर्णन करतो.छोट्या शिकारी,आलेले यश,लागलेला कस हे वाचनीय आहे. खूप थ्रील असं नाही परंतु जे काय आहे ते खूप सरळ आहे.त्यातली काही वाक्य खूप स्फुरण देणारी आहेत. "जंगलात शिकार करताना तासंतास वाट पाहावी लागते.आपल्याला पाहिजे तसा क्षण व प्राणी दिसेपर्यंत वाट पाहावी लागते."हे वाक्य टॉम,जिमचा मोठा भाऊ शिकारी बद्दल समजवताना बोलतो. "जोपर्यंत प्राणी आपल्याला किंवा इतर कोणाला त्रास देत नाही त्याला मारले नाही पाहिजे. ऋतू मागून ऋतू बदलतात,वर्षानुवर्ष बदल होतात,झाडाची पाने, फांद्या वादळात पडतात,पानझडी होते,काही दिवसांनी वसंत ऋतुत झाडाला नवीन पालवी फुटते, निसर्गात नव चैतन्य येते.असेच काही आपले आयुष्य देखील आहे. हे सर्व काही अंतिम नसते.आज वसंत ऋतू आहे, उद्या दुसरा ऋतु आहे.अवतीभवतीचे पर्यावरण प्रत्येक दिवशी बदलत असतो. समोरचे बहरलेले झाड फळा फुलांनी भरते,त्यावरती पक्षी आपले घर बसवतात,परिवार मोठा करतात,प्राणी त्यांची शिकार करतात, पक्षांची मुले मोठी होतात इत्यादी पद्धतीने निसर्गचक्र चालू राहते." दुसर्‍या महायुद्धात जिम समाविष्ट होते.युद्धकाळात जंगलातून वाट काढत सैनिकांना प्रशिक्षण देताना त्यांनी जंगल विद्येचा सदुपयोग केला. 1925 मध्ये नरभक्ष प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिश शासनाने त्यांना खास बोलावले. तेव्हा गडवाल, रुद्र प्रयाग परिसरामध्ये नरवक्षक वाघ आणि बिबट्यांचा खूप धुमाकूळ होता. तेव्हा या ज्ञानानेच कॉर्बेट यांना खूप मदत केली. "वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे अनेक क्षेत्र लागवडीखाली आली आहेत आणि वनांची संख्या कमी होत आहे. झाडे तोडले जातात फुले फळे यांचे देखील नाश होतो आहे हे अतिशय त्रासदायक आहे. या विनाशाचा एक परिणाम म्हणजे लाखो माकडांना जंगलातून शेतीच्या जमिनीवर हाकलून देण्यात आले. संयुक्त प्रांतात माकडांची संख्या दहा लाख आहे. पिके आणि बागेवर जगणे ही एक फार मोठी समस्या आहे."त्यांचा विश्वास होता सर्व वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक वातावरण आनंदी असतात. लहान असताना जिमने एक पक्षी आणि त्याची पिल्ले, गरुडांनी पकडलेले लहान प्राणी किंवा मांसाहारी प्राणाने पकडलेल्या हरण/ चितळ वाचवायचा प्रयत्न केला.परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की एकाला वाचण्याच्या प्रयत्नात मी दोघांचा मृत्यू ओढून आणणार आहे.जंगलाचा कायदा वेगळाच असतो हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. निसर्गाचा समतोल राखणे हे विशिष्ट पक्षी आणि प्राण्यांचे कार्य आहे.हे कार्य पार पाडण्यासाठी प्रत्येक जण आपापली तजवीज करून घेतो. मारेकरांच्या दृष्टिकोनातून शत्रूंना आकर्षित करू नये म्हणून त्वरित हत्या करणे आवश्यक आहे आणि ती कमीत कमी करण्यासाठी निसर्गाने केलेली तरतूद देखील आहे. प्रत्येक प्रजातीची स्वतःची हत्या करण्याची पद्धत आहे.शिकार करणारा शिकारी प्राणी आणि भक्ष यांचा तुम्ही अभ्यास एकदा करून बघा असं ते म्हणतात. प्रत्येक प्राण्याची शिकार करण्याची पद्धत अभ्यासण्यासारखी असते. एखादा प्राणी थोडा जरी संथ झाला तरी त्याची लगेच शिकार होते. प्रत्येक प्राण्याची शत्रूला वार करण्याची रीत खूपच निराळी असते. शिकार करताना प्रत्येकाची शक्तिस्थाने माहिती असायलाच हवीत. दोन जमातीतील प्राणी देखील कशा पद्धतीने एकमेकांवर हल्ला करतात आणि प्रत्येक प्राण्याची डिफेन्स आणि अटॅक सिस्टीम काय असते याबद्दल आपल्याला खूप सरळ शब्दांमध्ये ते माहिती देतात. विविध भारतीय प्राणी आणि पक्षांची माहिती,वेगवेगळ्या प्राण्यांसोबतचे शिकार अनुभव,प्राण्यांच्या आवाजांविषयी त्यांच्या हालचाली इत्यादी माहिती कळते. प्रकरण नऊ मध्ये जिम आपल्याला लहानपणीची आठवण सांगतात. ते स्वयंसेवक रायफल्सच्या स्कूल कॅडेटच्या कंपनीत सामील होण्यासाठी कसे पात्र ठरले आणि कशा पद्धतीने नेमबाजीचे शिक्षण पूर्ण केले. सर्वप्रथम आयुष्यात केलेल्या बिबट्याच्या शिकारीच्या अनुभव ते सांगतात.प्रकरण दहा मध्ये जिम आणि कुवर सिंह ज्यांच्याबद्दल त्यांनी माय इंडिया पुस्तकात लिहिले आहे ,त्यांच्यासोबत केलेल्या शिकारी सफरीचा उल्लेख करतात. उणीव हे पुस्तक वाचताना काही उणीवा मला वाचक म्हणून जाणवल्या. मुद्रणमध्ये काही चुका आहेत.ज्या प्रुफ रीडर ने वेळीच काळजी न घेतल्यामुळे वेळोवेळी खटकतात.टायपिंग मिस्टेक देखील आहेत. अनेक कथा आणि प्रकरणांमध्ये लेखक शिकारीची कथा लिहिता लिहिता अचानकच प्राणिमात्रांबद्दल माहिती ,प्रवृत्ती, प्रकृती, शिकारीची पद्धत,शारीरिक रचना इत्यादी बद्दल बोलतो.त्यामुळे एक वाचक म्हणून मला वैयक्तिक असे वाटले की वाचकाचा फ्लो कुठेतरी खंडित होतो.वाचनातला रंगभंग होऊ शकतो. त्यामुळे पुस्तक थोडेशे कंटाळवाणे होते. आता हा मुळ पुस्तकाचा परीघ आहे की अनुवादात झालेले स्वैर भाषांतर हे मुळ पुस्तक वाचक योग्य सांगतील. हे पुस्तक संकलित गोष्टींसारखे आहे.डॉक्टर सोमण यांनी कथा संकलित केलेल्या आहेत. काही ठिकाणी आहे तसे भाषांतर झाले,त्याच्यामध्ये मराठी भाषेचा अंतरंग जाणवत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी मुळ इंग्रजी आवृत्ती वाचण्याचा देखील प्रयत्न करावा.कारण ज्या पुस्तकांचे जवळपास प्रकाशाचे हक्क संपले आहेत,अनेकांनी त्यांच्या कथा संकलित करून वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रिंट केलेले आहेत. समारोप माझ्या मते एकदा वाचण्यास नक्की हरकत नाही .जिम यांच्या वैयक्तिक आयुष्य, शिकारी शिक्षण, जंगलाशी असलेल नात आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हे नक्कीच उत्तम पुस्तक आहे. जिम यांचे विचार "जंगलाची विद्या आत्मसात करत असताना आपल्याला आदिमानवाच्या काळापासून संपादित केलेले ज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. आपल्याला त्यात भर घालावी लागेल. जंगल विद्या पेक्षा जंगल संवेदना हे नाव मला अधिक योग्य वाटते."ह्यातून आपल्याला जिम यांची संवेदनशीलता जाणवते. "संवेदनशील माणूस चालू क्षणाचे भान ठेवतो.तो सदैव सजग असतो. संवेदनशील माणूस प्रत्येक क्षणाचे स्वागत करतो.तसेच जंगलात वावरताना आपला अहंकार आणि आक्रमकता बाजूला ठेवतो.तसेच तो जंगलात घडणारा प्रत्येक घटनेचे व घडामोडीचे भान ठेवतो." असे हे जिम कॉर्बेट ह्याचे एक वेगळे रूप दाखवणारे पुस्तक व त्याचा परिचय आपणास कसा वाटला हे जरूर कळवा.धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

द मोटरसायकल डायरीज

प्राचीन भारतीय खगोल विज्ञान