प्राचीन भारतीय खगोल विज्ञान
प्राचीन भारतीय खगोल विज्ञान
लेखक: निलेश निळकंठ ओक, रूपा भाटी,लीना दामले
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
प्रथम आवृत्ती:डिसेंबर 2024
ISBN 978 -93 -480 48- 25-7
पृष्ठसंख्या 141
मूल्य 200/-
हे एक वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे.निलेश नीलकंठ ओक आणि रूपा भाटी यांच्या प्रसिद्ध पॉडकास्ट मुलाखतीनंतर आपले भारतीय खगोलशास्त्र अधिक खोल वाचावेसे वाटले.
पुस्तकाचे तीन प्रमुख भाग आहेत.
1. भारतीय ज्ञान संस्कृतीचे प्राचीनत्व
2. प्राचीन भारतीय खगोल विज्ञान :निरीक्षण,पुरावे,निष्कर्ष
3.मध्ययुगीन कालखंडातील ज्ञान परंपरा
4.संदर्भ ग्रंथ सूची
हे पुस्तक मुळात सुर्य सिद्धांत या अतिशय प्रसिद्ध खगोलशास्त्रावरील ग्रंथाचा प्रमाण मानत लिहिलेले आहे.तसेच इंडोलॉजी या विषयातील विद्यार्थ्यांना देखील अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे.यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक निष्कर्ष,त्याच्याबद्दल असलेले तर्क,पुरावे,अज्ञान यावरती मुख्यत्वे प्रकाश टाकण्याचे काम करते. इतिहासाला पुराणाची जोड देत पुराव्यासकट गोष्टी सादर करण्यामध्ये हे पुस्तक एक महत्त्वाची भूमिका बजावते.
दुर्दैवाने आपला इतिहास,भूगोल हा मोठ्या प्रमाणामध्ये परकीय लोकांनी पेरलेल्या गोष्टींवरती आधारित शिकवला जातो. परंतु सुर्य सिद्धांत, महाभारत,रामायण,ऋग्वेद व इतर महाकाव्य या मधील खगोलशास्त्रीय फेर रचनांचे काळ ठरवून,खगोलशास्त्रीय घटनांचा पुरावा देत त्यांचा काळ अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
परिचय
प्रकरण पहिले प्राचीन भारतीय ग्रंथांमधील आधुनिक विज्ञान
प्रथम प्रकरणामध्ये भारतीय ग्रंथांमधील आधुनिक विज्ञान यावर लेखक प्रकाश टाकतात.भारतीय हिंदू संस्कृती ही साधारणतः 20000 वर्ष इसवीसन पूर्वकालीन कशी होती, त्याचे योग्य खगोलशास्त्रीय पुरावे देऊन आपल्याला लेखक अधिक माहिती देतात.प्राचीन भारतीय किती अभ्यासक,संशोधती वृत्तीचे होते हे आपल्याला या प्रकरणातून समजते. प्राचीन भारतीयांना धूमकेतू हे संज्ञा,त्यांचे फिरण्याचे कालावधी,ठराविक पॅटर्न हे माहिती होते. जीवसृष्टी निर्मितीचा प्रवास किंवा उत्क्रांती याची देखील आपल्या पूर्वजांना जाणीव होती. पृथ्वीचे भ्रमण, तिचा कललेला अक्ष ,गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय बल,पृथ्वी गोल आहे हे सुद्धा आपल्या प्राचीन भारतीयांना माहिती होते. ग्रहण कशा पद्धतीने होते हे आपल्या भारतीयांनी आपल्या ग्रंथांमधून खूप सुंदर पद्धतीने लिहिलेले आहे.
शून्य,अनंत,सम,विषम संख्या याचे गणितातील महत्त्व, त्रिकोणमिती ज्याला आज आपण पायथागोरस थेरम म्हणतो, इतरही अनेक खगोलशास्त्रीय घटनांचा उल्लेख महाभारतात देखील श्लोक स्वरूपात दिलेला आहे.त्याचा योग्य अभ्यास केला तर कालखंड ठरवण्यामध्ये अधिक अचूकपणा येतो हे अधोरेखित होते.
प्रकरण दुसरे प्राचीन भारतीय कालगणना
प्राचीन भारतीय कालगणना या प्रकरणामध्ये लेखक आपल्याला विविध तारका समूहांची बघण्याची पद्धत,पृथ्वी आणि तिचा अक्ष, फिरण्याच्या गती,भगोल आणि भूगोल याविषयी आपल्याला माहिती देतात. पृथ्वीचा संपातचलन,अक्ष,कालगणना किंवा युग गणना,चांद्र वर्ष, सौर वर्ष या मधला फरक, लीप ईयर किंवा अधिक मास याची गरज याचे अतिशय शास्त्रशुद्ध पुरावे लेखक देतात. उत्तरायण,दक्षिणायन, 27 नक्षत्रे ,अभिजीत एक नक्षत्र होते ते नंतर का वगळले गेले,वेगवेगळ्या राशी कशा पद्धतीने बनवल्या, तारका समूह ,तिथी किंवा चांद्रमास,वर्षात बाराच महिने, ठराविक वेळात येणाऱ्या ऋतू, प्रहर मोजण्याची किंवा कालगणनेची पद्धत इत्यादी खूप सुंदर माहिती मिळते.
प्रकरण तिसरे महाभारत काळ निश्चिती
महाभारताचा काळ हा वेगवेगळ्या खगोलशास्त्रीय घटनांच्या मदतीने ठरवणे अतिशय सोपे आहे.या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून इसवी सन पूर्व 5561 सालामध्ये साधारणता महाभारत झाले.त्याला त्यांनी अरुंधतीचे युग आणि अभिजीत ताऱ्याचे पतन या दोन मोठ्या खगोलशास्त्रीय घटनांचा आधार घेत आपल्याला समजावले आहे.ग्रह वक्री होणे म्हणजे ग्रेट प्रोग्रेड मोशन, चांद्रमासाचा ऋतू कशा पद्धतीने बदलतो,भगवान श्रीकृष्णाचं वय कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आपल्याला या प्रकरणात अतिशय सोप्या पद्धतीने कळते.कृष्णाच्या बाबतीत आत्मप्रतिती, गुरुप्रतिती आणि शास्त्रप्रतिती या तीन पद्धती समजतात.
प्रकरण चौथे रामायणातील खगोलशास्त्रीय पुरावे
रामायण आणि त्याचा खगोलशास्त्रीय पुराव्याच्या दृष्टिकोनातून काळ निश्चिती कशा पद्धतीने झाली याचा सार या प्रकरणात आहे.इसवी सन पूर्व 12000 ते 14000 या दरम्यान रामायण घडले असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्याला त्यांनी अनेक खगोलीयघटनांचा आधार दिला आहे.लक्ष्मण,हनुमंत,जामवंत इत्यादी अभ्यासू वीरांनी गुंफलेल्या श्लोकाचा आधार आहे. सतत बदलणारे ध्रुव तारे,उत्तरेकडील ध्रुव तारा आणि दक्षिणेकडील ध्रुवतारा अभिजीत (वेगा तारा) ह्या बद्दल शास्त्रीय माहिती कळते.
प्रकरण पाचवे रावणाची लंका नेमकी आहे कुठे?
आजच्या काळात जरी ठामपणे (किंवा मेंदूमध्ये भरवले गेले असल्याने) सध्याचा श्रीलंका हाच रावणाची लंका प्रदेश आहे असं एक मत आहे. परंतु अनेक पुरावे देऊन रावणाची लंका ही साधारणता खोल समुद्रात कुठेतरी होती आणि ती आता सध्या पाण्याच्या खाली गेली आहे हे ह्या प्रकरणात समजावले आहे.भारतीय उपखंड, भूभागाचे विविध नकाशे आणि भूगर्भशास्त्रज्ञांना मिळाले पुरावे ह्याच्या मदतीने वाल्मिकी रामायणात लंकेच्या स्थानासाठी नैऋत्य दिशेकडे जागा दाखवली जाते. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रात लंकेच्या स्थानासाठी निरक्ष म्हणजे 0° या स्थानाकडे निर्देश होतो. प्राचीन काळातील अनेक प्रवासी आणि खलाशी यांच्या नोंदीमध्ये लंका आणि सिंहल द्वीप हे वेगवेगळ्या जागा आहेत अशी नोंद आहे.त्यामुळे अधिक खोल जाऊन ओशनोग्राफी च्या मदतीने रावणाची लंका जागेचे निश्चितीकरण व्हावे असे लेखक म्हणतात.
प्रकरण सहावे सुर्य सिद्धांत
सुर्य सिद्धांत हा प्राचीन वाङ्मयातील/ खगोलशास्त्रातील अतिशय उत्तम आणि मान्यताप्राप्त ग्रंथ आहे.त्यात 14 प्रकरणे आणि 500 श्लोक असुन अतिशय समृद्ध ज्ञान आहे. त्याचा सारांश आपल्याला या प्रकरणांमध्ये वाचायला मिळतो.सुर्य सिद्धांतांचे आधार घेत रामायण,महाभारत इत्यादी कालावधी ठरवण्यामध्ये आपल्याला खूप मदत होते हे लेखक प्रांजळपणे कबूल करतात.यातील अनेक श्लोकांचा योग्य अर्थ घेत विविध तारकासमूहातील बदल इत्यादी नोंदणी आणि काल गणना यांची ओळख होते.
प्रकरण सातवे ऋग्वेद काळ निश्चिती आणि सरस्वती नदी
सरस्वती नदी आणि तिचं अस्तित्व हे जिऑलॉजिकल डाटाच्या मदतीने तर आता सगळ्यांना समाजाला सुरुवात झालेली आहे. अनेक अभ्यास शाखांमधून त्याला पुष्टी मिळते. सरस्वती नदी ही एक लाख 72 हजार वर्षापूर्वी संपूर्ण पद्धतीने भारतामध्ये वाहत होती. साधारणता 70000 वर्षांपूर्वी बिकानेर जवळून वाहणारा प्रवाह सरकला आणि कालीबंगन सोडून वाहायला लागला. 50 हजार वर्षांपूर्वी यमुना आणि शतद्रु या उपनद्या कालीबंगन जवळून वाहत होत्या. 50 ते 40 हजार वर्षांपूर्वी काहीतरी असे बदल झाले ज्यामुळे यमुना नदी सरस्वती मधुन वेगळी झाली आणि आग्नेकडे वळून गंगेला मिळाली.13000 वर्षांपूर्वी शतद्रु दक्षिणेला न वळता पश्चिमेकडे वळाली.तो लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे.त्यामुळे सरस्वती नदीचे पात्र बरेच लहान झाले. अशा पद्धतीने कमी अधिक प्रमाणात साधारणतः 4500 वर्षांपूर्वी ती संपूर्ण सुकली आणि पात्राचे स्वरूप छोट्या-मोठ्या प्रवाहात झाले. भाक्र (bhakra)नदी रूपाने ती आजही वाहते आहे. परंतु मूळची महामहा प्रचंड अशी सरस्वती नदी मात्र लुप्त झाले आहे.ऋग्वेद,रामायण,महाभारतातील तिचा उल्लेख आहे.या प्रकरणामध्ये अनेक नकाशे व तक्ते दिले आहेत. ज्यामुळे या विषयाचे आपल्याला अतिशय सखोल माहिती मिळते.
प्रकरण आठवे राजा बृहद्रथाची विलक्षण भौगोलिक निरीक्षणे
बृहद्रथ हा रामाचा पूर्वज होता.लास्ट ग्लेशियल मॅक्सिमम या काळाशी त्याचा काळ जुळतो.अगस्ती ऋषींनी सागर प्राशन केले हे त्या काळाशीच मिळते जुळते आहे.तसेच दक्षिणेकडील अगस्तीचा तारा उत्तरेकडील कुरुक्षेत्र पर्यंत एकीकडे दिसायचा याचे वर्णन देखील तो करतो. तो एक इश्वाकु राजा होता. मैत्रायणी आरण्यक उपनिषद आणि ऋग्वेद सोडून इतर ठिकाणी याचं नाव फारसा आपल्याला सापडत नाही.वंशावळ सांगितल्या जातात.पण त्यात तो श्रीरामाचे नाव घेत नाही जो सिद्ध इतिहास आहे.इश्वाकु वंशातील हरिश्चंद्र राजाच्या उल्लेखानंतर तो थांबतो.त्यानंतर भरत,मरुत्त आणि आविक्षित या दुसऱ्या शाखेतील राजांचा उल्लेख तो करतो. ह्यामुळे सिद्ध होते की तो राम राज्य काळ च्या खुप आधी होऊन गेला. मैत्रायणी आरण्यक उपनिषदात संवत्सर म्हणजे वर्ष मघा नक्षत्रातून सुरू होते.अशी परिस्थिती 8000 वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर नाही.त्याच्या आधी जेव्हा बृहद्रथ राजा होता.जेव्हा मघा नक्षत्रात वसंत संपात येत होता तेव्हा समुद्राची पातळी वाढतच होती, कमी होत नव्हती आणि राजा बृहद्रथ चिंतेत होता की ही पातळी सतत वाढते आहे.मघा नक्षत्रात वसंत संपादनाचा 8000 वर्षांपूर्वीचा किंवा 34 हजार वर्षांपूर्वीचा आहे.यावरून सिद्ध होते की ऋग्वेद काळात इश्वाकु राजा बृहद्रथ होऊन गेला.शाक्यायन ऋषींशी बोलताना त्या काळात घडणाऱ्या भौगोलिक घडामोडीबद्दल चिंता व्यक्त करत होता. याचाच अर्थ आपल्या देशाचा इतिहास इतका जुना आहे आणि आपल्या पूर्वजांनी भौगोलिक आणि खगोल सखलज्ञान होते. प्रगल्भ आणि तेजस्वी अशी संस्कृत भाषा तेव्हापासून त्यांना माहिती होती.
प्रकरण नवे कृतिका, रुक्ष आणि आरुक्ष
आपल्याला प्रसिद्ध कृतिकाचा तारका समूह,त्याचे सप्तश्री तारका समूह सोबत असलेलं नातं या बद्दल वर्णन आहे. सप्त मातृका आणि षड् मातृका,विविध पुराण कथा यांचा उहापोह आहे.
प्रकरण दहावे रोहिणी शकट भेद
रोहिणी शकट भेद ही अशी घटना आहे की त्याचा शास्त्र शुध्द अभ्यास आणि नोंद फक्त आपल्या अति प्राचीन वाङ्मयात सापडते. इतर पाश्चिमात्य साहित्य त्या बद्दल त फार लिहीत नाही. नक्षत्र मंडळातल्या बारा राशींपैकी वृषभ राशीमध्ये रोहिणीचा लालसर तारा आह. त्याच्या जवळून जेव्हा मंगळ आणि शनी ग्रह शकट भेद करतात तेव्हा काहीतरी प्रलय येतो अशी नोंद आपल्या पुराणांमध्ये आहे. याचे अनेक कालखंड दाखवले गेले आहेत.ह्या घटनेची नोंद जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये केली गेलेली नाहीये. परंतु आपल्या वाङ्मयात त्याचा उल्लेख आहे.त्यामुळे आपलं वांग्मय संस्कृती किती समृद्ध होती याची कल्पना येते.
प्रकरण अकरावे गुरुच्या चार नर्तकी आणि शनीचे सात हात
आपल्या पूर्वजांना शनी ग्रहाला किमान सात चंद्र आहेत आणि गुरु ग्रहाला चार प्रमुख चंद्र आहेत याची माहिती कित्येक वर्षांपूर्वी होती. परकीय लोक सोळाव्या शतकामध्ये गॅलिलिओने आणि नंतर हर्षल ने ते शोधले असे सांगतात. परंतु आपल्या पूर्वजांना त्यापेक्षाही अधिक चांगली माहिती होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या देशाला फक्त गुलामच बनवले नाही तर कपट वागवून मसाले, संपत्ती, ज्ञान, मूर्ती कला जे मिळेल ते लुटून नेले. पिअर्स नावाच्या एका व्यक्तीने रॉयल सोसायटीला लिहिलेल्या लेखांमध्ये आपल्याला आपल्या ज्ञानाच्या चौऱ्याकर्माची त्यांनीच दिलेली कबुली सापडते. आणि कर्नल इयर्सच्या या 1783 च्या पत्रानंतर सहा वर्षांनी हर्षल ला शनीच्या सातव्या चंद्राचा शोध लागला यावरून हे किती चौरे कर्म होते हे आपल्याला नक्कीच कळते. त्याबद्दल लेखक अशा अज्ञात लेखकांना आणि ब्रिटिश लायब्ररीला मनापासून धन्यवाद देतात.
प्रकरण बारावे अगस्त्य,नटराज आणि अपस्मार
विंध्य पर्वत आणि अगस्त्य ऋषी यांची असलेली पौराणिक कथा तसेच त्याला असलेले शास्त्रीय जोड,अगस्त ताऱ्याचा अस्त आणि त्याचा उगम याचा अतिशय सखोल अभ्यास या धड्यामध्ये आहे. रोज दिसणारा मृग नक्षत्र म्हणजे ओरायन त्याला जोडलेल्या कथा पण त्याच्यामध्ये असलेली योग्य अशी कहाणी किंवा दिसणारे तारखा समूह त्यांचे महत्त्व आपल्याला विविध आकृत्यांमध्ये लेखक पटवण्याचा प्रयत्न करतात.जरी आपल्याला विंध्यवस्था ही कथा माहिती असली तरी त्याला खगोलशास्त्र दृष्ट्या खूप मोठा असा बेस आहे.ही घटना इसवी सन पूर्व 21000 साली झाली अशी नोंद आहे. '
प्रकरण तेरावे शिशूमार चक्र
शिशूमार चक्र याचा उल्लेख येतो श्रीमद् भागवत ग्रंथांमध्ये 23 वे स्कंद. शिशूमर चक्राचे वर्णन हे दुसरे तिसरे काहीही नसून ecliptic किंवा आयएनिक वृत्ताला लागू होते. गोलाकार असलेला शिशूमर नावाचा काल्पनिक जलचर प्राणी आयनिक वृत्ताच्या जागी कल्पून संपूर्ण नक्षत्र चक्र आपल्या पूर्वजांनी उभे केले आहे. आयनिक वृत्त म्हणजे खगोलातील नक्षत्रांमधून जाण्याचा सूर्याचा भासमान मार्ग. उरसा मेजर (सप्तश्री) आणि ध्रुव मत्स्य म्हणजे उरसा मायनर या तारका समूहांमधून जाणारा विविध कार्य घटनांचा उल्लेख या प्रकरणात आहे.
प्रकरण चौदावे मध्य भारतातील ज्योतिर्लिंगे आणि संपात
ह्या प्रकरणात मध्य भारतातील ज्योतिर्लिंगे आणि संपात याचा अतिशय सुरेख संबंध दिला आहे.प्रत्येक ज्योतिर्लिंग आणि मंदिर किती विचारपूर्वक बांधला गेलं होतं,काळ ओळखण्याची/ कालगणण्याची आपली विशिष्ट सूक्ष्म निरीक्षक अशी पद्धत होती. आपले मोठे मोठे मंदिरे बांधले गेले जसे कोणाचे सूर्य मंदिर,बारा ज्योतिर्लिंग,सोमनाथ,उज्जैन इत्यादी जेथे संपात दिसतो. या प्रकरणात आपल्या पूर्वजांचे खगोलशास्त्र,पृथ्वीच्या अक्षांश रेषाचे सूक्ष्मज्ञान किती ग्रहण होते याची जाणीव होते. त्यांचा ज्योतिष शास्त्र आणि खगोलशास्त्राचा असलेला खोलवरचा अभ्यास आणि वास्तू स्थापत्यशास्त्राचाही अभ्यास यामुळेच अशी सुंदर आणि शास्त्रीय दृष्ट्या मंदिरे अचुक मंदिरे बनवण्यात त्यांना यश आले हे जाणवते.
प्रकरण पंधरावे ज्ञानेश्वरीतील विश्वरूप दर्शन की युनिव्हर्स
ह्या प्रकरणातून ज्ञानेश्वरी आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय सुंदर मेळ दाखवला आहे. ज्ञानेश्वरी तेरावा शतकात लिहिली गेली आणि कोपर्णीकसला सोळाव्या शतकात कळाले की पृथ्वी गोल आहे. अशा पद्धतीने आपले साहित्य किती धीर गंभीर आणि विचार करण्याचे होते. परक्यांना 16 व्या शकतात जे समजले ते आपल्या पूर्वजांना पिढीजात माहीत होते.विश्व रचना,दीर्घिका,कृष्ण विवर इत्यादी ....ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला आश्चर्यचकित करणारा किती गोष्टी माउलींनी मांडले आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे.
प्रकरण सोळावे दासबोधतील खगोलशास्त्र
दासबोध आणि खगोलशास्त्राचा अतिशय सुंदर संबंध आहे.दासबोधातील श्लोक आणि त्यामध्ये असलेले खगोलशास्त्राचे पुरावे रामदास स्वामींच्या गहन ज्ञानाचा प्रत्यय देतात. आपल्या वाङ्मयांमध्ये चंद्र, अवकाशातील इतर ग्रह गोलांवर पाणी आहे याचा उल्लेख दिसतो.अनेक वर्ष पाश्चिमात्यांना हे थोतांड वाटले किंवा तशी समजुत होती. पण आता चंद्रावर सापडलेले पाणी, बुध ग्रहाच्या खळग्यांमध्ये सापडलेले पाणी तसेच शनी आणि गुरु यांच्या चंद्रावर सापडलेले पाणी हे आता त्यांना मान्यच करावे लागेल. कालगती चक्रकार आहे हा शोध देखील आपल्या पूर्वजांनी लावला होता. समर्थांनी भविष्यवाणी केली का डोळस अभ्यास मांडला?! समर्थांना त्रिवार दंडवत.
समारोप
हे एक वेगळ्या धाटणीचे पुस्तक जरूर वाचावे. आपले शास्त्रज्ञ, संस्कृती,धर्मग्रंथ, काव्य,महाकाव्य,खगोलशास्त्रातील भरपूर अभ्यास असलेले लोक याबद्दल आपल्याला या पुस्तकातून माहिती कळते. तसेच ज्यांना हे वाचणे शक्य नसेल ते बियर बायसेप किंवा निलेश ओक यांचे झालेले youtube वरील विविध मुलाखती देखील ऐकू शकता.अनेक व्याख्यानमालांमध्ये देखील ओक यांना बोलावण्यात आले आहे. रूपा भाटीजी यांचे देखील झालेले इंटरव्यू हे खूप ऐकण्यासारखे आहेत. इतक्या सुलभ आणि सरळ पद्धतीने अवघड विषय एक ते दीड तासांमध्ये सहज उलगडून सांगतात ते खरच खूप ऐकण्यासारखे आहे.हे पुस्तक नक्कीच घेऊन वाचण्यासारखे आहे. आपल्या संस्कृतीचा मान म्हणून संग्रही ठेवण्यासारखे आहे.परिचय कसा वाटला जरूर कळवा.धन्यवाद.
Comments
Post a Comment